bapat and pacharne in light mood | Sarkarnama

अशोक पवारांना भाजपात घेण्यासाठी बापटांची बाॅलिंग! त्यावर आमदार पाचर्णेंची बॅंटींग!!

नितीन बारवकर
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

शिरूर : बाबूराव पाचर्णे व अशोक पवार या शिरूरच्या आजी - माजी आमदारांतून विस्तव जात नसताना, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या दोघा दिग्गज नेत्यांना जवळ घेत, दोघांच्या खांद्यावर हात टाकत शिरूरच्या उमेदवारीबाबत गुगली टाकल्याने शिरूर मतदार संघाच्या राजकीय "तिकीट' बारीवर अचानत चर्चेची रंगत वाढली.
 

शिरूर : बाबूराव पाचर्णे व अशोक पवार या शिरूरच्या आजी - माजी आमदारांतून विस्तव जात नसताना, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या दोघा दिग्गज नेत्यांना जवळ घेत, दोघांच्या खांद्यावर हात टाकत शिरूरच्या उमेदवारीबाबत गुगली टाकल्याने शिरूर मतदार संघाच्या राजकीय "तिकीट' बारीवर अचानत चर्चेची रंगत वाढली.
 
चासकमान कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आमदार बाबूराव पाचर्णे व माजी आमदार अशोक पवार काल मुंबईत आले असताना, पालकमंत्री गिरीश बापट यांनी दोघांशीही दिलखुलास चर्चा करताना शिरूरच्या उमेदवारीवरून गुगली टाकली. मात्र, या दोन्ही नेत्यांनी तेवढ्याच कौशल्याने व खिलाडूवृत्तीने उमेदवारीचा हा चेंडू बापट यांच्याच कोर्टात नेऊन टाकला. 

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपकडून बाबूराव पाचर्णे व राष्ट्रवादीकडून अशोक पवार असा सामना झाला. त्यात पाचर्णेंची सरशी झाली. तत्पूर्वीच्या विधानसभेत पवार यांनी तालुक्‍याचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच विधानसभेत गिरीश बापटही होते. बापटांच्या कामाने प्रभावित झालेले पवार तेव्हापासून त्यांच्या प्रेमात पडले; तर पवारांची कर्तबगारी आणि कामाचा झपाटा पाहून बापटही प्रभावित झाले. विभिन्न पक्षात असूनही बापट - पवारांच्या मैत्रीचे तेव्हापासून सुरू झालेले किस्से आजतागायत तालुक्‍यात चर्चिले जात आहेत. पवारांची बापटांशी असलेली मैत्री पाचर्णे देखील चांगलेच ओळखून आहेत व खासगीत बोलताना ते त्याचा उल्लेखही आवर्जून करतात; तसेच अशोक पवारांच्या बापट यांच्याशी असलेल्या मैत्रीचा धोका ओळखून पवार हे बापटांपासून चार हात दूर कसे राहतील, याचीही वेळोवेळी खबरदारी घेतात. 

दरम्यान, काल मुंबईत झालेल्या बापट यांचे दालनात आगमण होताच पाचर्णे यांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले व हस्तांदोलन करीत जवळ गेले. मात्र, काही वेळापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीतून गेलेले असल्याने अशोक पवार यांनी सावधानता बाळगत आपल्या जागेवरूनच बापटांवर हास्यबाण फेकला. पण एवढ्याने थांबतील ते बापट कसले. त्यांनी पवारांना जवळ बोलावत पाचर्णे व तुमचा एकत्र फोटो काढा, असा प्रेमाचा आदेश दिला. त्यावर पाचर्णे व पवार या दोघांनीही अत्यंत हुशारीने "तुम्हीही फोटोत हवेत', असा आग्रह धरत त्यांना दोघांच्या मधे घेतले. त्यावर बापटांनीही दोघांच्या खांद्यावर हात टाकत हास्यमुद्रेने "पोझ' दिली.

हे "फोटोसेशन' चालू असतानाच त्यांनी शिरूरच्या उमेदवारीची गुगली टाकली. "बाबूराव, अशोकरावला आपल्याकडे घेऊ, तुम्हाला कसे वाटते ?' त्यावर पाचर्णे काहीसे गडबडले. पण क्षणात त्यांनी स्वतःला सावरत ते आपल्याकडे येत असतील तर त्यांचे मनापासून स्वागत आहे, असे सांगत बाजू सावरली. पण चाणाक्ष बापटांनी पुढचा चेंडू थेट त्यांच्या यष्ट्यांवर टाकत, ते आपल्याकडे आल्यावर त्यांना उमेदवारीही द्यावी लागेल, असे सांगताच पाचर्णे चपापले. पण दुसऱ्याच क्षणी "हो, शंभर टक्के द्यावी लागेल. त्यांना लोकसभेची आणि मला विधानसभेची', असे सांगत त्यांनी चपळाईने बाजू मारून नेली. तुम्हालाही (बापट यांना) लोकसभेत जायची इच्छा आहे. ते पण लोकसबभेत येतील. त्यामुळे दोघांनाही शुभेच्छा, पाचर्णे यांच्या या मल्लिनाथीवर बापटांसह सर्वांनीच दिलखुलास दाद दिली आणि बैठकीची वेळ झाल्याने सर्वजण एकत्रितपणे बैठकीसाठी गेले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख