bapat and kakade put me aside from pune politics | Sarkarnama

बापट व काकडे यांच्या खेळीचा मला फटका; पण दुष्काळ नक्की सरेल : बीडकर

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 9 मार्च 2018

भाजपचे संख्याबळ कमी असताना पुणे महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेले गणेश बीडकर हे सध्या पालिकेच्या राजकारणापासून दूर आहेत. पक्षाची सत्ता येऊनही त्यांनी सध्या इनॅक्टिव्ह राहणे पसंत केले आहे. काय आहेत त्यांच्या नाराजीची कारणे? 

पुणे : दिल्ली आणि मुंबईत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पुणे महापालिकेत "किंगमेकर'च्या भूमिकेत वावरणारे भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर कुठे "गायब' आहेत, याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे उत्तर खुद्द बीडकर यांनीच दिले आहे. पालकमंत्री गिरीश बापट व भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या राजकीय खेळीमुळे मी सध्या पालिकेच्या राजकारणापासून दूर आहे. मात्र हा राजकीय दुष्काळ नक्कीच सरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर व्यक्त केली.

बीडकर हे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत पराभूत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पालिकेचे स्वीकृत नगरसेवकपद मिळवून दिले. तरीही ते पालिकेत फारसे फिरकत नाहीत.  विशेष म्हणजे, महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत सलग पंधरा- सोळा वर्षे भाषण करणाऱ्या बीडकरांनी आपल्या पक्षाच्या दुसऱ्या अर्थसंकल्पाकडेही पाठ फिरवली. २०१४ मार्च २०१७ पर्यंत बीडकर हे पालिकेतील भाजपचे किंग मेकर होते. त्यांच्या एका पराभवाननंतर त्यांना अडगळीत पाठविण्यात त्यांचे विरोधक यशस्वी झाले. 

बीडकर हे का इनॅक्टिव्ह झाले आहेत, याबाबात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थेट बापट आणि काकडे यांना लक्ष्य केले. ``बापट हे वैयक्तिक पातळीवर यशस्वी राजकारणी आहेत. त्यांच्या राजकारणाची वेगळी स्टाइल आहे. मात्र या स्टाइलमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बळी जातो. बापट आणि भाजप संघटनेचे नेहमीच कधी जमले नाही. शहराध्यक्ष विजय काळे असोत की अनिल शिरोळे यांच्याशीही त्यांचे कधी सख्य नव्हते. तसेच राजकारण त्यांनी माझ्याशी केले. पक्षाच्या संघटनेपेक्षा त्यांनी त्यांची समीकरणे जुळवली,`` अशी टीका बीडकर यांनी केली. काकडे यांचा तर पक्ष संघटनेशी काही संबंधच नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलायलाच नको, असे त्यांनी सांगितले.

``मुख्यमंत्र्यांना या साऱ्या बाबी माहीत आहेत. आमची केडर बेस संघटना आहे. मी अनेक वर्षे या संघटनेचे काम केले आहे. त्यामुळे हा दुष्काळ नक्की सरेल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी बीडकर यांची शिफारस केल्यानंतर हे पद नाकारले गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेत राडा घातला होता.

याबाबत बोलताना बीडकर म्हणाले की या प्रकाराने मी खट्टू झालो. कारण ज्यांनी मला विरोध केला त्यांना मी वेळोवेळी मदत केली होती. संघटनेतील माझे काम पाहून माझ्या नावाचा विचार झाला होता. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने विरोध करणे माझ्यासाठी धक्कादायक होते. आता आगामी काळात तरी पालिकेत सक्रिय होणार का, याबाबत त्यांनी पक्ष संघटना योग्य वेळी मला संधी देईल, असे त्यांनी यावर सांगितले.

बीडकर यांच्या स्पष्टोक्तीमुळे शहर भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. बीडकर यांनी मनातील सल व्यक्त केली खरी पण त्यावर पक्षांतर्गत विरोधक काय उत्तर देणार, याची आता प्रतिक्षा आहे.

संबंधित लेख