ban-entry-mahajan-raval-bhamre-demands-anil-gote | Sarkarnama

गोटेंचा महाराष्ट्राला 'हादरवून' टाकणारा धमाका आता सोमवारी ,पण तीन मंत्र्यांना धुळेबंदीची मागणी

निखिल सूर्यवंशी
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

 आपल्यासह कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या थोरातला चाळीसगाव येथून अटक झाल्यानंतर थोरातच्या फोनवर मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचे फोन गेले. तशा संदर्भाची दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या फोनवरील संभाषणाची क्‍लिप आपल्याला मिळाली आहे .

-अनिल गोटे

धुळे : " माझ्या   कुटुंबाची सोशल मीडियाव्दारे बदनामी करणारा विनोद थोरात आणि त्याच्या  गुंडांना संरक्षण देणारे  देत भाजपचे तीन मंत्री आणि काही पदाधिकाऱ्यांना दहा डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात प्रवेश बंदी करावी", अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रकार परिषदेव्दारे केली.

या माध्यमातून महाराष्ट्र हादरविण्याचा त्यांचा रोख असून आयोगाने दोन दिवसात निर्णय न घेतल्यास वादग्रस्त ऑडीओ क्‍लिप मुंबईतून जाहीर केली जाईल, असे अनिल गोटे  सांगितले. 

 महापालिका निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत संघर्षात आमदार गोटेंनी लोकसंग्राम संघटनेच्या बॅनरखाली उमेदवार दिले आहेत. त्यानंतर बुधवारी रात्री शहरातील चितोड नाक्‍यावर झालेल्या कॉर्नर सभेत त्यांनी राज्य हादरवेल, देश हादरवेल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आज दुपारी दोनला त्यांनी कल्याण भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. 

आमदार गोटे म्हणाले, "  आपल्यासह कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या थोरातला चाळीसगाव येथून अटक झाल्यानंतर थोरातच्या फोनवर मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचे फोन गेले. तशा संदर्भाची दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या फोनवरील संभाषणाची क्‍लिप आपल्याला मिळाली आहे . या क्‍लिपसह आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शासनाने तक्रारीची दखल न घेतल्यास सोमवारी सकाळी साडेदहाला संभाषणाची क्‍लिप माध्यमांसमोर जनतेसाठी खुली करू."

" शहरातील काही गुंडांच्या टोळ्यांशी या तीन मंत्र्यांचे घनिष्ठ संबंध आहेत व भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेने धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची जबाबदारी नेमकी या तिन्ही मंत्र्यांवर सोपविली आहे. सराईत गुंडाशी यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध व अधिकाराचा सर्रास दुरुपयोग करण्याची मानसिकता यामुळे महापालिकेची निवडणूक मुक्त मोकळ्या वातावरणात होऊच शकत नाही ," असा  आरोप   आमदार गोटे यांनी केला . 

" जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, तसेच भाजपचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी शहराध्यक्ष हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, या सर्व मंत्र्यांच्या स्वीय सचिवांना जिल्ह्यात दहा डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी केली जावी. तसेच सर्वांचे दूरध्वनी निरीक्षणाखाली ठेवण्यासंबंधी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांचे व पोलिस अधिकाऱ्यांचे फोनही निरीक्षणाखाली ठेवण्यासंबंधी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा आदेश व्हावा," अशी मागणी आमदार गोटे यांनी केली. 

महापालिकेच्या निवडणुकीत दहापैकी तब्बल सहा निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव जिल्ह्यातील असल्याबाबतच्या तक्रारीचाही गोटेंनी या तक्रारीत उल्लेख केला आहे. निवडणूक काळात काही गुंडांना तडीपार करण्यात आले. मात्र, ज्यांच्यावर 307,395,302 असे गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, त्यांना मात्र राजकीय संरक्षण मिळाल्याचे दिसून येत असल्याचेही गोटेंनी म्हटले आहे. धुळे महापालिकेच्या निवडणूकीसाठी राज्य सरकार पणाला लावले असल्याचेही गोटे म्हणाले. 

संबंधित लेख