Balbharti e book issue - Education minister Vinod Tawde | Sarkarnama

बालभारतीचे पुस्तक व्हायरल केलेल्यांवर सायबर सेलतर्फे कारवाई -विनोद तावडे

सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

राज्यातील इयत्ता दहावीचे बालभारतीचे संपूर्ण पुस्तक व्हॉट्स ऍपवर  व्हायरल झाल्यानंतर पुन्हा चारवेळा त्यामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. संबंधितांवर सायबर सेलमार्फत कारवाई करण्यात येत आहे.

मुंबई : " राज्यातील इयत्ता दहावीचे बालभारतीचे संपूर्ण पुस्तक व्हॉट्स ऍपवर  व्हायरल झाल्यानंतर पुन्हा चारवेळा त्यामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. संबंधितांवर सायबर सेलमार्फत कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर आता राज्य शासनाकडे पाठ्य पुस्तकांचे कॉपीराईट असणार आहे. यामुळे कोणत्याही खासगी कंपनीला मार्गदर्शक पुस्तक छापण्यासाठी किंवा खासगी क्लासेस घेण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल, " अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

राज्यातील दहावीचे बालभारतीचे पुस्तक व्हॉट्स ऍपवर  व्हायरल झाल्यासंदर्भात सदस्य सुनिल प्रभू यांनी लक्षवेधी मांडली होती.

श्री तावडे म्हणाले, " राज्य शासन जे पाठ्यपुस्तक छापते त्यानुसार इतर कंपन्या राजरोसपणे गाईड, मार्गदर्शक पुस्तक छापत असत. हे आटोक्यात आणण्यासाठी शासन कार्यवाही करीत आहे. व्हायरल झालेले पुस्तक पुन्हा चारवेळा दुरूस्त करण्यात आले आहे. आता शासनाच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे कॉपी राईट असणार आहे. कुणालाही गाईड छापण्यासाठी किंवा खाजगी क्लास घेण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे खाजगी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल होणार नाही. "

संबंधीत प्रकरणासंदर्भात सायबर सेल कारवाई करीत असून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. तावडे यांनी दिली.

या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख