Balasaheb Vikhe Patil Nagar | Sarkarnama

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मारकाचे प्रवरानगरला भूमिपूजन

सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

पद्मश्रींनी उभारलेल्या सहकार चळवळीला डॉ. बाळासाहेबांनी आधुनिकतेची जोड दिली. मूर्ती छोटी असली तरी त्यांचे कर्तृत्व महान होते. ते राज्य आणि देशव्यापी प्रश्नांचा अभ्यास करणारे नेते होते. त्यांचा इतिहास नव्या पिढीने अभ्यासला पाहिजे.

-माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मारकाचे आज प्रवरानगर साखर कारखाना परिसरात भूमिपूजन करण्यात आले.

शुक्रवारी  डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती होती. या दिवसाचे औचित्य साधून वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशीलेची स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. अरुण जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. सौ. स्नेहलता कोल्हे, आ. राहुल जगताप, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भूमिपूजन झाल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना सुशीलकुमार शिंदे यांनी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींचे प्रतिक म्हणून उभे राहत असलेले स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला आणि मेहनतीला सलामच ठरेल, असे प्रतिपादन केले. पद्मश्रींनी उभारलेल्या सहकार चळवळीला डॉ. बाळासाहेबांनी आधुनिकतेची जोड दिली. मूर्ती छोटी असली तरी त्यांचे कर्तृत्व महान होते. ते राज्य आणि देशव्यापी प्रश्नांचा अभ्यास करणारे नेते होते. त्यांचा इतिहास नव्या पिढीने अभ्यासला पाहिजे, असेही ते म्हणाले.

वरिष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांनीही डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम म्हणजे जणू एक प्रकारची लोकसभाच असल्याची उपमा शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना दिली.

अध्यक्षीय संबोधन करताना माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विखे पाटील परिवाराच्या तीन पिढ्यांशी असलेला ऋणानूबंध उलगडून सांगितला. भारती विद्यापीठाच्या उभारणीतही पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांनी सहकार्य केल्याचे सांगून ही बाब सदैव आपल्या स्मरणात राहील, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी प्रास्ताविक करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार साहेबांचे हे स्मृतिस्थळ नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा प्रवरा परिवाराच्या वतीने सत्कार केला व कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.

या कार्यक्रमाला डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे चाहते, नगर जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,सहकारी संस्थांचे संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

संबंधित लेख