balasaheb thorat rememebrs vilasrao deshmukh | Sarkarnama

हजरजबाबी विलासराव : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जागविल्या स्मृती

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब थोरात यांनी जबाबदारी सांभाळली होती. दोघांचेही संबंध जिव्हाळ्याचे होते. विलासरावांच्या स्मृतिदिनी त्यांच्या अनेक प्रसंगांची बाळासाहेबांना आठवण झाली. त्यांनी सांगितलेला विलासरावांच्या हजरजबाबी पणाचा हा किस्सा!

विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना स्वाधीन क्षत्रिय मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव होते, त्या कालखंडात घडलेला हा प्रसंग. अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि त्या विभागासाठी धोरणात्मक भूमिका निभावण्याचे काम केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग करतो. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांवर गदा येते आहे अशा संदर्भाने काही तक्रारी या आयोगाकडे गेल्या होत्या, आयोगाने अत्यंत कडक शब्दात महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून यासंदर्भाने चिंता व्यक्त केली, शिवाय तातडीने एकत्रित बैठक घेऊन यावर उत्तर देण्याच्या सूचनाही केल्या.

मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे हे पत्र आले. त्यासोबत एक प्रश्नावलीही होती. क्षत्रिय यांनी लगोलग या प्रश्नांची उत्तरे तयार केली, सोबत अतिरिक्त माहितीही जोडली. एक फाईल तयार करून अल्पसंख्यांक आयोगाच्या बैठकी अगोदर दोन दिवस मुख्यमंत्री असलेल्या विलासरावांकडे ती अवलोकनार्थ पाठवली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, ‘आयोग रागावलेला आहे, आम्ही काही उत्तरे तयार केली आहे, आपण बघून घ्या.’
 
बैठकीचा दिवस उजाडला, स्वाधीन क्षत्रिय तणावात होते. अल्पसंख्यांक आयोग हा अत्यंत कडक शिस्तीचा होता, काही चुकीची उत्तरे गेली तर तो सरकारला धारेवरही धरू शकतो. मुख्यमंत्र्यांना दोषीही ठरवू शकतो, याची जाणीव क्षत्रिय यांना होती. बैठकी अगोदर त्यांनी विलासारावाना विचारले, ‘तुम्ही तयारी केली का? फाईल नजरेखालून घातली का? विलासराव म्हणाले, ‘कसला वेळ मिळतोय, मात्र तुम्ही का टेन्शन घेताय? बघू की आपण!’

बैठक मुख्यमंत्री कार्यालयातच होणार होती. विलासराव स्वाधीन क्षत्रिय यांना म्हणाले, 'बैठकीला कोण कोठे बसणार आहे? चला जरा बघून येऊ.' स्वाधीन क्षत्रिय विलासरावांना घेऊन बैठकीच्या जागी गेले. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, प्रधान सचिव सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक विभाग आदी प्रमुख अधिकारी दोन बाजूस आणि त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री व पुढील बाजूस आयोगाचे लोक बसतील अशी रचना स्वाधीन क्षत्रिय यांनी समजावून सांगितली. अल्पसंख्यांक आयोगात केंद्र सरकारने नेमलेले सचिव दर्जाचे निवृत्त अधिकारी, खासदार सहभागी असतात, सहसा ही सारी मंडळी अल्पसंख्यांक समाजाचेच प्रतिनिधी असतात.

आयोगाचे प्रमुख बैठक सुरू करणार तोच, विलासराव म्हणाले, 'आपण आमच्याकडे पाहुणे आहात, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रथम आमची ओळख करून दिली पाहिजे.आयोगातील सदस्यांनी होकार दिला! आणि विलासराव बोलू लागले.

 ‘मी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माझ्या शेजारी बसलेत ते जॉनी जोसेफ, हे मुख्य सचिव आहेत. अलीकडून बसलेले सरदार विर्क जे पोलिस महासंचालक आहेत. त्यांच्या शेजारी हसन गफूर, जे मुंबईचे पोलिस आयुक्त आहेत. या बाजूला श्रीमती थँक्सी फ्रान्सिस थेकेकरा आहेत, त्या सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम बघतात आणि हे स्वाधीन क्षत्रिय जे प्रधान सचिव - मुख्यमंत्री कार्यालय आहेत.’
ही सर्व मंडळी ख्रिश्चन, शीख, मुस्लीम समाजातील होती. प्रत्येकाची ओळख ऐकताना त्याची जाणीव आयोगातील सदस्यांना होत होती. विलासराव पुढे म्हणाले, ‘राज्याचे प्रशासन या सर्व मंडळींच्या हाती आहे, ते सर्व कारभार बघतात, मी मुख्यमंत्री आहे. आता करा बैठक सुरू!’ विलासरावांनी मिश्किल टिप्पणी केली.
त्यावर अल्पसंख्यांक आयोगातील सदस्य खळखळून हसले, तणाव निवळला आणि सकारात्मक वातावरणात बैठक पार पडली. 

ज्या राज्यातील प्रशासनाच अल्पसंख्यांक समजल्या जाणाऱ्या समाजातील मंडळी बघते, तिथे वाद उरतो कुठे? अशा हजरजबाबी भूमिकेने विलासरावांनी त्यादिवशी सर्वांनाच निरुत्तर केले होते. विलासरावांकडे अद्भुत बुद्धीचातुर्य, तितकाच आत्मविश्वास आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कसब होते.

आज स्वर्गीय विलासरावांची उणीव पदोपदी जाणवते, महाराष्ट्राच्या शेत-शिवाराची, शेतकऱ्यांच्या परिस्थितीची अचूक जान असणाऱ्या या लोकनेत्याला माझ्यासह उभा महाराष्ट्र मिस करतोय!  विलासराव देशमुख साहेब, आपल्याला विनम्र अभिवादन!

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख