balapur-maratha-kunabi-card | Sarkarnama

बाळापूर विधानसभा मतदारसंघात भाजप खेळणार कुणबी कार्ड?

श्रीकांत पाचकवडे 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सबका साथ सबका विकासचा नारा देत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा गड पुन्हा एकदा सर करण्यासाठी पक्षातंर्गत रणनिती आखल्या जात असून त्याच पार्श्वभुमीवर विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात भाजप कुणबी कार्ड खेळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अकोला : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सबका साथ सबका विकासचा नारा देत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा गड पुन्हा एकदा सर करण्यासाठी पक्षातंर्गत रणनिती आखल्या जात असून त्याच पार्श्वभुमीवर विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात भाजप कुणबी कार्ड खेळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचे युवा नेतृत्व म्हणुन भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण मोरखडे यांचे नाव चर्चेत असल्याने निवडणुकीच्या उमेदवारीसाठी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि सरचिटणीस मोरखडे यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. 

अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात बाळापूर मतदारसंघ हा महत्वाचा समजल्या जातो. राज्याचे माजी कृषी मंत्री (कै.) भाऊसाहेब फुंडकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. भाऊसाहेबांच्या निधनानंतर सामाजीक समीकरणाचा समतोल राखण्यासाठी या मतदारसंघात कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व दिल्या जाऊ शकते. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजप महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे संदीप पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. 

मात्र, ऐनवेळी स्थानिक नेत्यांनी ही उमेदवारी प्रतीष्ठेची करीत भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना नामाकंन अर्ज मिळवून दिला. त्यानंतर संदीप पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत भाजपविरुद्ध दंड थोपटले. गत निवडणुकीत शिवसेना, शिवसंग्राम यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने या मतदारसंघावर वर्चस्व असलेले भारिप बहुजन महासंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी पुन्हा विजयी पताका फडकविली. 

आगामी निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जोरदार तयारी केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांनीही ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारिप बहुजन महासंघाकडून आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी निश्‍चित समजल्या जात आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी या मतदारसंघात संदीप पाटील यांनाच उमेदवारी देणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघात भाजपची उमेदवारी कोणाला मिळते यावरच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघातील सामाजीक समीकरण पाहता आगामी निवडणुकीत भाजप कुणबी समाजाला प्राधान्य देण्याची शक्‍यता आहे. 

या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पातळीवर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आणि श्रीकृष्ण मोरखडे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपमधील अंतर्गत राजकारण पाहता तेजराव थोरात यांचे तळ्यात-मळ्यात असल्याने खासदार संजय धोत्रे गटाची त्यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तर नारायणराव गव्हाणकर हे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निकटवर्तीय समजल्या जातात. त्यामुळे आगामी निवडणणुकीत बाळापुर मतदारसंघात उमेदवारीची थोरात, गव्हाणकर, मोरखडे यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात पडते? यावर जोरदार चर्चा रंगत आहे. 

संबंधित लेख