Bahubali making revenue department strong ! | Sarkarnama

करमणूक करामुळे जिल्हा प्रशासन "बाहुबली' : आठवड्यात साडेपाच कोटींची महसूल वसुली !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

"मे महिना करमणूक कर विभागासाठी विशेष आहे. "बाहुबली 2' चित्रपटातून चांगला करमणूक कर मिळाला आहे. आगामी 'ईद' सणाच्या दिवशी सलमान खानचा "ट्यूबलाईट' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.  त्यामुळे करमणूक कर विभागाला पुढील दोन महिन्यांत चांगला महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.'' 

- सुषमा चौधरी- पाटील  करमणूक कर विभाग तहसीलदार

पुणे, ता:  'बाहुबली 2' या चित्रपट प्रदर्शनामुळे जिल्हा प्रशासनाकडे करमणूक करापोटी एका आठवड्यात तब्बल पाच कोटी 48 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता महिन्याभरात आठ ते दहा कोटी करमणूक कर जमा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात 25 मल्टीप्लेक्‍स आणि 31 एकपडदा चित्रपटगृह आहेत. यांमधून पाहिल्या जाणाऱ्या चित्रपट प्रदर्शनातून दरमहा जवळपास चार कोटींचा करमणूककर जमा होतो.

गेल्या आर्थिक वर्षात करमणूक कर विभागाकडे जवळपास 65 कोटींचा कर जमा झाला आहे. 28 एप्रिलला "बाहुबली 2' हिंदी, मल्याळमसह पाच भाषेत प्रदर्शित झाला आहे. त्यातून जिल्ह्यातील चित्रपटगृहांतून आतापर्यंत पाच कोटी 48 लाख रुपये करमणूक कर वसूल झाला आहे. 

दोन महिन्यांत चांगला महसूल मिळेल 
याबाबत करमणूक कर विभागाच्या तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील म्हणाल्या, "मे महिना करमणूक कर विभागासाठी विशेष आहे. "बाहुबली 2' चित्रपटातून चांगला करमणूक कर मिळाला आहे. आगामी 'ईद' सणाच्या दिवशी सलमान खानचा "ट्यूबलाईट' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

याप्रमाणेच काही उत्कृष्ट मराठी व हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे करमणूक कर विभागाला पुढील दोन महिन्यांत चांगला महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.'' 

संबंधित लेख