बदामीच्या धनगरांनी वाचवली सिद्धरामय्यांची इज्जत! 

बदामीच्या धनगरांनी वाचवली सिद्धरामय्यांची इज्जत! 

पुणे: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी परंपरागत वरुणा मतदारसंघ मुलासाठी सोडून चांमुडेश्‍वरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, मात्र तो निर्णय धोक्‍याचा असल्याचे त्यांच्या वेळीच लक्षात आले. खबरदारी म्हणून बदामी मतदारसंघातूनही त्यांनी अर्ज दाखल केला. हा निर्णय घेताना त्यांनी स्वत:च्या कुरबा (धनगर) समाजावर भरोसा ठेवला होता. अपेक्षेप्रमाणे समाजही सिद्धरामय्यांच्या पाठिशी उभा राहिला. अन्यथा सिद्धरामय्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले असते. 

सिद्धरामय्या हे कर्नाटकातील लोकप्रिय नेते होते, ते एकहाती कॉंग्रेसला जिंकून देतील, असे सुरवातीचे चित्र होते. मात्र त्यांनी कॉंग्रेसमधूनच विरोध होत होता. सिद्धरामय्या हे जेडीएसमधून कॉंग्रेसमध्ये गेलेले असल्याने देवेगौडा समर्थक सिद्धरामय्यांचे खच्चीकरण करण्याची संधी शोधत होते. त्यामुळेच वरुणा सोडून इतर मतदारसंघातून लढण्याचे आव्हान त्यांना देण्यात येत होते. सिद्धरामय्या राज्याचे नेते असल्याने, त्यांना आपला प्रभाव दाखवण्यासाठी विरोधकांचे आव्हान स्विकारावे लागले. त्यांनी चामुंडेश्‍वरी मतदारसंघ निवडला, मात्र हा निर्णय तोट्याचा असल्याचे त्यांच्या वेळीच लक्षात आले. 

चांमुडेश्‍वरी हा जेडीएसचा पाठीराखा असलेल्या वोक्‍कालिंग समाजाचे प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. तिथे जेडीएसने जे. टी. देवेगौडा या तगड्या उमेदवाराला रिंगणात उतरवले. स्वत: वोक्‍कालिंग असलेल्या जे. टी. देवेगौडा यांच्यापुढे सिद्धरामय्या कॉन्फीडन्ट नव्हते. त्यामुळे सिद्धरामय्या पराजित होवू शकतात, असा मेसेज गेला. सिद्धरामय्या यांचा पाठिराखा असलेला त्यांचा कुरबा समाजही चांमुडेश्‍वरीत अल्प असल्याने सिद्धरामय्यांनी बदामीचा पर्याय शोधला. 

बदामीत कुरबांचे मतदान 50 हजारांच्यावर आहे. ही जागा कॉंग्रेसकडेच होती. त्यामुळे ती सिद्धरामय्यांना सुरक्षित वाटली. सिद्धरामय्यांनी दुसरा मतदारसंघ म्हणून बदामी निवडल्याचे समजताच भाजपनेही जोरदार फिल्डींग लावली. दलित वर्गातील युवा खासदार श्रीरामुलू यांना भाजपने सिद्धरामय्यांविरोधात उतरवले. श्रीरामुलू सर्व ताकदीनिशी उतरल्याने बदामीतही सिद्धरामय्या पराभूत होवू शकतात, अशी हवा भाजपने तयार केली. दोन्ही बाजूंनी जोरदार ताकद लावण्यात आली. सिद्धरामय्यांनी इतर कुरबा उमेदवार उभे राहू नयेत, अशी दक्षता घेतली. राष्ट्रीय समाज पक्षाने मोहनकुमार यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी शक्‍तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला होता, मात्र रासपमुळे सिद्धरामय्य अडचणीत येवू नये म्हणून त्यांनी शेवटच्याक्षणी माघार घेतली होती. 

प्रत्यक्षात सिद्धरामय्यांना जे वाटत होते, तसेच घडले. चांमुडेश्‍वरीत त्यांना मोठा पराभव पहावा लागला. चांमुडेश्‍वरीत जे. टी. देवेगौडांकडून सिद्धरामम्या 36 हजार मतांनी पराभूत झाले. बदामीत ते अवघ्या दीड हजार मतांनी विजयी झाले. कुरबा मतदार पाठीमागे उभे राहिल्याने सिद्धरामय्यांची इज्जत वाचली. रासपचे मोहनकुमार जरी रिंगणात राहिले असतेतरी कुरबा मतांचे विभाजन झाले असते. परिणामी कॉंग्रेसला प्रचंड अपेक्षा असलेला हा नेता राजकीय अस्तित्व संपवून बसला असता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com