bachhu kadu shetkari andolan | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार बच्चू कडूंचा पुन्हा एल्गार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 जुलै 2017

अकोला : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा फसवी ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर 14 ऑगस्टला राज्यभर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. या दळभद्री सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 ऑगस्टला झेंडा वंदनही करू देणार नसल्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे. 

अकोला : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा फसवी ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर 14 ऑगस्टला राज्यभर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. या दळभद्री सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 ऑगस्टला झेंडा वंदनही करू देणार नसल्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांची धग अद्यापही कायमच आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा शासनाने केली; मात्र कर्जमाफीच्या आदेशात अनेक जाचक अटी लादण्यात आल्याने ही कर्जमाफी केवळ बनवा-बनवीच ठरली आहे. 2016-17 व त्यापुर्वीचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या कर्जमाफीबद्दलच्या भाषणात याचा साधा उल्लेखही केला नाही असे कडू म्हणाले 

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न अधांतरीच आहे. त्यांना केवळ 25 हजार रुपये देऊन भागणार नाही. त्यासाठी निधी वाढविण्याची मागणी आमदार कडू यांनी केली आहे. 2009 च्या कर्जदारांचे कर्ज माफ केले; मात्र 2008 च्याआधीचा कर्जदारांचे काय? त्यांना माफी का नाही असाही प्रश्न आमदार कडू यांनी उपस्थित केला आहे. पाच लाख कर्ज असेल तर साडेतीन लाख भरा मग दीड लाख माफ होते हा कुठचा न्याय? असे म्हणत हे सरकार केवळ शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत आमदार कडू यांनी 14 ऑगस्टला राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

या आंदोलना अंतर्गत या दळभद्री सरकारमधील पालकमंत्र्यांचे हात पवित्र तिरंग्याला लावू द्यायचे नाहीत. या दिवशी जिल्हाधिकारी किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या हस्ते झेंडा वंदन करण्यासाठी सरपंच, सभापती, नगराध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. 

ही अस्तित्वाची लढाई 
पीक विमा भरण्यासाठी नांदेडच्या एका शेतकऱ्याला मरावे लागले. ही आपल्या राज्याची शोकांतिका आहे. हे सरकार शेतकऱ्यांना अस्तित्त्वहिन करण्याच्या मागे लागले असून आपल्या अस्तित्त्वाच्या लढाईसाठी पक्षभेद विसरून सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. 

संबंधित लेख