Bacchu Kadu Criticises MLA's of Nashik | Sarkarnama

कागदावर लिहिलेला काहीही मजकूर हा राजीनामा नव्हे : नाशिकच्या आमदारांवर बच्चु कडूंचा 'प्रहार' 

संपत देवगिरे 
गुरुवार, 26 जुलै 2018

आमदारांच्या राजीनाम्याची एक कार्यपध्दती निश्‍चित केलेली आहे. कार्यकर्त्यांना दिलेला व कागदावर लिहिलेला मजकुर म्हणजे राजीनामा ठरत नाही. त्यामुळे असे राजीनामे केवळ राजकीय स्टंट ठरतील. त्याने आंदोलनाचे गांभिर्य कमी होईल अशी भीती, मोर्चाच्या संयोजकांनी व्यक्त केली आहे. 

नाशिक : मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्‍वभुमीवर आज भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. राहूल आहेर आणि सीमा हिरे यांनी आपले राजीनामे कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांऐवजी कार्यकर्त्यांकडे दिलेले राजीनामे गांभिर्याने दिले की तो राजकीय स्टंट आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. प्रहार संघटनेचे बच्चु कडू यांनीही असे 'राजीनामे' देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरु असतांना दोन दिवसांपूर्वी आमदारांना राजीनामे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याआधीच शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव यांनी या मागणीसाठी राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आज यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांचा मिळाला. मात्र, चिकटगावकर यांचा राजीनामा मिळालेला नाही, अशी माहिती आहे. आमदारांच्या राजीनाम्याची एक कार्यपध्दती निश्‍चित केलेली आहे. कार्यकर्त्यांना दिलेला व कागदावर लिहिलेला मजकुर म्हणजे राजीनामा ठरत नाही. त्यामुळे असे राजीनामे केवळ राजकीय स्टंट ठरतील. त्याने आंदोलनाचे गांभिर्य कमी होईल अशी भीती, मोर्चाच्या संयोजकांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्र विधानसभा नियम पुस्तकातील भाग 20, पान क्रमांक 123 मध्ये "विधानसभेतील जागांचा राजीनामा' यामध्ये त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानुसार स्वलिखीत स्वरुपात "मी, दिनांक....पासून मध्यान्हपूर्व, मध्यान्हानंतर विधानसभेतील माझ्या जागेचा माझा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे. आपला विश्‍वासू'' असा मजकुर लिहून त्यावर सही करावी लागते. या तरतुदींचा विचार करता राजीनामे देऊन भाजप आमदारांनी धोरणी पाऊल उचलले. मात्र, त्याचा लाभ होण्याऐवजी त्यांच्या अंगलट येण्याचीच शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने नाशिकचे राजीनामे चर्चेचा विषय ठरले आहेत. 

राजीनामा द्यायचा असेल तर तो थेट विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा. कागदावर काहीही मजकुर लिहून कार्यकर्त्यांकडे दिलेले, पत्र राजीनामा ठरत नाही. असा पोरकटपणा आमदारांनी करु नये. ते योग्य नाही - आमदार बच्चु कडू, प्रहार संघटना.

मराठा आरक्षणाचे आंदोलन सनदशीर मार्गाने व अतिशय गंभीरपणे सुरु आहे. सामाजाच्या व विशेषतः युवकांच्या या विषयावर भावना तीव्र आहेत. त्याचे गांभीर्य कोणीही कमी करु नये. राजीनामा द्यायचा असेल तर कायदेशीररित्या विधानसभा अध्यक्षांकडे पाठवावेत - चंद्रकांत बनकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा.

#MarathaKrantiMorcha

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख