" मिलिंद' च्या रुपाने बाबासाहेबांनी गरीबांच्या मुलांसाठी उघडले अखंड प्रकाशाचे जग

" मिलिंद' च्या रुपाने बाबासाहेबांनी गरीबांच्या मुलांसाठी उघडले अखंड प्रकाशाचे जग

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात उच्च शिक्षण संपादन करत अस्पृश्‍य समाजातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर ब्रिटीश सरकारकडून शिष्यवृत्ती मंजूर करून घेतली होती. भारतीय राज्यघटनेत त्याचा कायदा केला. पुढे प्रजासत्ताक गणराज्याच्या यशस्वी वाटचालीसाठी एक जागरुक समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक योजना आखल्या. शिक्षणाचा विशेषतः उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा त्याच विचारांचा एक भाग होता. या कल्पनेतून उपलब्ध साधनसामुग्रीच्या जोरावर बाबासाहेबांनी 1945 मध्ये मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर औंरगाबादकडे त्यांनी लक्ष दिले. बाबासाहेबांच्या आजच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांनी उभारलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या रुपाने त्यांची आठवण सदैव काढली जाते. 

मुंबईत उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर बाबासाहेबांनी मराठवाड्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले. येथील गोर-गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे हा ध्यास मनात ठेवत 19 जून 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करत गरीबांसाठीच्या शिक्षणाचा पाया रचला. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या दोन्ही शैक्षणिक संस्थामधून जी शैक्षणिक प्रगती झाली त्याची कशाबरोबरही तुलना करता येणार नाही. पूर्वीच्या निजाम स्टेटमधील मराठवाडा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला होता. अशा भागात बाबासाहेबांनी उच्चशिक्षण व उच्च संस्कृतीचे केंद्र उभे केले. मिलिंद महाविद्यालयात पहिल्या वर्षी 140 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यांना शिकवण्यासाठी बाबासाहेबांनी विविध ठिकाणाहून उच्चशिक्षित व निष्णात प्राध्यापकांना बोलावून त्यांची नियुक्ती मिलिंद महाविद्यालयात केली होती. 

मराठवाड्यातील विविध भागातून विद्यार्थी मिलिंदमध्ये शिक्षणासाठी येऊ लागले. त्यांना सर्वोतोपरी मदत केली जायची. महाविद्यालयात काही सहशिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली होती. या शिवाय महिलांनी उच्चशिक्षणाकडे वळावे, नियमित महाविद्यालयात यावे यासाठी त्यांना येण्या-जाण्यासाठी बाबासाहेबांनी एका बसची देखील व्यवस्था केली होती. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थांना शासनाकडून शिष्यवृत्ती मंजुर होईपर्यंत महाविद्यालयाच्या फंडातून या विद्यार्थांना ठराविक रक्कम दिली जायची. सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची कवाडे खुली केली होती. संस्थेने औरंगाबादेत घेतलेल्या 160 एकर परिसराला नागसेनवन व महाविद्यालयाला मिलिंद असे नाव देण्यात आले होते. या मागे येथील विद्यार्थ्यांनी राजा मिलिंद व शिक्षकांनी भन्ते नागसेन यांचा आदर्श ठेवावा हा बाबासाहेंबाचा हेतू होता. 

बाबासाहेब मिलिंदला नियमित भेट द्यायचे.. 
मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीत बाबासाहेबांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यामुळे मिलिंद महाविद्यालयाची इमारत बांधून तयार होईपर्यंत ते नियमित इथे यायचे. प्रत्यक्ष ज्ञानार्जनाला सुरूवात झाली तेव्हा देखील बाबासाहेब महाविद्यालयात यायचे तेथील विद्यार्थी, शिक्षक यांच्यांशी संवाद साधायचे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवायचे. शिक्षक, विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बाबासाहेब मिलिंद किंवा नागसेनवन परिसरात आले की आजूबाजूचे नागरिक देखील मोठ्या संख्येने त्यांच्या भेटीसाठी यायचे त्यांच्याशी बोलायचे. या शहरावर बाबासाहेबांचे खूप प्रेम होते. 1933-34 पासून त्यांचा औरंगाबादशी संबंध आला. अनेकदा औरंगाबादेत येत, तेव्हा रेल्वे हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असे. 

मिलिंदच्या इमारतीचा नकाशा बाबासाहेबांनी स्वतः लक्ष घालून बनवला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वसतिगृह, करमणूक हॉल, डायनिंग हॉल, किचन रूम, स्टोअर रूम अशा प्रकारच्या सोयींचा समावेश करून त्यांनी आराखडा तयार केला. ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्राध्यापकांच्या खोल्या, मुलींच्या खोल्या, स्वच्छतागृहे, सभागृह, असं सगळं उभं केलं. कॉलेज उभं राहिलं. मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येथे आले. शिकले, मोठे झाले. त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले, त्यांचे आयुष्य घडवले त्या महामानवाने. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com