Babarao Pachpute Rahul Jagap Nagar News | Sarkarnama

पैलवान 'राहूल' यांना थोबीपछाड देण्यासाठी पाचपुतेंनी कसला लंगोट

संजय आ. काटे
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पाचपुते यांचा काल ६४ वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला. विविध कामांचे उदघाटने करतानाच शहरातील मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करीत पालीका व त्यांनतर होणाऱ्या विधानसभेचे रणसिंग फुंकले. गेल्यावेळी नवख्या राहूल जगताप यांच्याकडून पराभव झाला, हे पाचपुते व त्यांचे समर्थक विसरत नाहीत हेच पुन्हा एकदा कालच्या कार्यक्रमात अधोरेखित झाले. त्यातच जगताप यांच्यासाठी सगळेच विरोधक एकत्र आले, ही जखम अजूनही ताजीच असल्याचे जाणवले.

श्रीगोंदे (जि. नगर) : गेल्या विधानसभेतील पराभवाचे शल्य मनात घर करुन बसल्याने माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी आगामी विधानसभेची तयारी आत्ताच सुरू केली आहे. पराभवाचा वचपा काढताना 'साईकृपा'ची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा व्यवस्थितीत होत असल्याने नगरपालीका व  विधानसभेसाठी 'कामाला लागा' असे सांगत पैलवान आमदार राहूल जगताप यांना धोबीपछाड देण्यासाठी लंगोट कसला आहे.
 
पाचपुते यांचा काल ६४ वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला. विविध कामांचे उदघाटने करतानाच शहरातील मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करीत पालीका व त्यांनतर होणाऱ्या विधानसभेचे रणसिंग फुंकले. गेल्यावेळी नवख्या राहूल जगताप यांच्याकडून पराभव झाला, हे पाचपुते व त्यांचे समर्थक विसरत नाहीत हेच पुन्हा एकदा कालच्या कार्यक्रमात अधोरेखित झाले. त्यातच जगताप यांच्यासाठी सगळेच विरोधक एकत्र आले, ही जखम अजूनही ताजीच असल्याचे जाणवले.

पस्तीस वर्षात तालुक्यासाठी खुप केले तरीही आपल्याला लोकांनी नाकारले यावरुन त्यांची हतबलता यापुर्वी जाणवत होती. त्याला कारण होते साईकृपा कारखान्याकडे लोकांची असणारी थकीत देणी. आता मात्र ही देणी चुकती होण्याची तयारी सुरु झाल्याने पाचपुते थोडे जून्या रंगात दिसू लागलेत. त्याची झलक कालच्या अभिष्टचिंतनात दिसली.

जगताप यांनी गेल्या चार वर्षात विरोधी आमदार असतानाही वेगळी छबी तयार केली आहे. संपर्काचा अभाव हा शिक्का त्यांच्यावर असला, तरी त्यांचे दिवंगत वडील कुंडलिकराव जगताप यांच्यानंतर सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने ते विचलीत होते, मात्र पुन्हा एकदा विधानसभेला त्यांचेसोबत असणाऱ्या मंडळींना सोबत घेवून विधानसभेची तयारी सुरु केल्याने पाचपुते समर्थकांनी त्यांना लक्ष्य करण्याचे धोरण घेतल्याचे दिसते आहे.

पाचपुते हे जगताप यांचे नाव न घेता यापुर्वी टीका करीत होते. आता ते त्यांच्यावर थेट टिका करू  लागल्याने विधानसभा निवडणूक कशी होईल, याची झलक दिसत आहे. कुकडी कारखान्यातील शेतकऱ्यांना दिलेली उचल, जगताप यांनी सुरु केलेले नवे व्यवसाय यावर ते राजकीय भाषेत त्यांच्या खास शैलीत आरोप करु लागले आहेत.

पस्तीस वर्षात काय केले हे विचारणाऱ्यांनी चार वर्षात काय दिवे लावले ? हे सांगावे हा त्यांचा आरोप राजकीय वाटतो. आमदार नसताना त्यांनी तालुक्यात विकासात्मक कामांसाठी आणलेला निधीचा आकडा भला मोठा असल्याने त्यावर विरोधक हल्ला करतील.  मात्र  पाचपुते यांना ते आमदार व मंत्री असताना कामे होण्यापुर्वीच केलेल्या घोषणांवर विरोधक ओरखडे ओढुन 'शिळ्या कढीला ऊत' आणणार असल्याने  असल्याने तालुक्यातील राजकारण लवकर तापणार असेच दिसते. 

विधानसभेची कुस्ती कशी रंगणार
राहूल जगताप हे पैलवान आहेत. कुस्ती करण्यात माहिर समजले जातात. मात्र पाचपुते यांचे वय ६४ असले तरी त्यांचा व्यायाम राजकीय नेत्यांच्यात कायम चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे पैलवान जगताप यांच्याविरोधात पाचपुते यांनी दंड थोपटल्याने विधानसभेची कुस्ती आरोप-प्रत्यारोपांच्या मैदानात  किती रगंणार हे थोड्याच दिवसात दिसेल. 
 

संबंधित लेख