babanrao taywade about maratha reservation | Sarkarnama

फडणवीसांनी OBC अधिवेशनात दिलेल्या शब्दावर कायम राहावे!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

52 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असलेल्या ओबीसी समाजाला राज्यात केवळ 19 टक्के आरक्षण आहे.

नागपूर : मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले होते. या शब्दावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायम राहावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले आहे. 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेण्यास ओबीसी आयोगाने संमती दिल्याच्या वृत्ताचे विदर्भात संतप्त प्रतिसाद उमटले असून ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी या कृतीचा विरोध केला आहे. ओबीसी महासंघाचे मुंबईत महाअधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 

या वक्तव्याची आठवण देऊन प्राचार्य तायवाडे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध नव्हता व नाही परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यास ओबीसींचा विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यात 52 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असलेल्या ओबीसी समाजाला राज्यात केवळ 19 टक्के आरक्षण आहे. यातही पुन्हा मराठा समाजाला समाविष्ट केल्यास या आरक्षणाला काही अर्थच राहणार नाही.

या निर्णयाला छगन भुजबळ प्रणित महात्मा फुले समता परिषदेनेही विरोध केला आहे. समता परिषदेचे विदर्भ संयोजक प्रा. दिवाकर गमे यांनी हा निर्णय ओबीसींवर अन्याय करणारा असल्याचे स्पष्ट आहे. 

संबंधित लेख