ayodya blog | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

अयोध्यामुळे युती अधिक भक्कम की मोदी सरकारची कोंडी ! 

प्रकाश पाटील 
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला एक तर भाजपला कोंडीत पकडायचे असावे, दुसरे परप्रांतीय मंडळी कधी नव्हे ती शिवसेनेच्या विरोधात गेली. त्यांना चुचकारायचे असावे किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी दुरावलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही असावा. हिंदुत्व हा दोन्ही पक्षांना जोडणारा धागा आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. 

हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली त्या घटनेला येत्या 6 डिसेंबर रोजी बरोबर 26 वर्षे पूर्ण होत आहे. "इस देश में रहना हो गा तो वंदे मातरम कहना होगा!' "कसम राम की खाते है ! मंदिर वही बनायेंगे!' अशा गगनभेदी घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यांत दिल्या जात होत्या.

केंद्रात नरसिंह रावांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार सत्तेवर होते. विरोधी बाकावर भाजप होता. भाजपचा हातात हात घालून शिवसेनाही अयोध्येतील राममंदिरासाठी सरसावली होती. 

मशीद कोसळल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, ""हो, शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल, तर त्याचा मला अभिमानच आहे!'' असे रोखठोक सांगून देशाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले होते. रामजन्मभूमीवरून देशातील वातावरण ढवळून निघाले होते. पुढे रामानेच भाजप-शिवसेनेला सत्तेवर आणले. राजकारणात या दोन्ही पक्षांना फायदा झाला. हा सर्व इतिहास आहे. 

नरसिंह रावांनंतर पुढे वाजपेयींचे सरकार आले. त्या वेळी काही पक्ष सरकारमध्ये होते. त्यात शिवसेनाही होती. वाजपेयी सरकारनंतर केंद्रात पुन्हा कॉंग्रेसचे सरकार आले. ते पुढे दहा वर्षे राहिले. म्हणजे 92 नंतर भाजप, कॉंग्रेसची सरकारे येऊन गेली. या वर्षात म्हणजे गेल्या 26 वर्षांत शिवसेनेला कधी अयोध्येतील रामाची आठवण झाली आहे.

राममंदिरासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचा एखादा खासदार किंवा नेता अयोध्येला जाऊन आला, असे काही झाल्याचे आठवत नाही. आता बरोबर 26वर्षांनी अचानक म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला रामाची आठवण झाली. 

गेल्या दसरा मेळाव्यात भाजपला लक्ष्य करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राममंदिराचा प्रश्‍न उकरून काढला आणि अयोध्येला जाण्याची सिंहगर्जना केली. गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार बहुमताने केंद्रात सत्तेवर आहे. तरीही ते राममंदिर का बांधत नाहीत ? राममंदिरासाठी कायदा का केला जात नाही ? ट्रिपल तलाकसाठी कायदा करता तर रामासाठी का नाही, असे कळीचे मुद्दे उपस्थित करून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. 

येत्या 24 तारखेला अयोध्येत जाण्याची तयारी शिवसेनेने केलेली आहे. उद्धव ठाकरे शिवनेरीगडावरील माती कलशात घेऊन अयोध्येला नेणार आहेत. तेथे ते पूजाअर्चा करणार आहेत. अयोध्येत शिवसेना गेल्याने देशात पुन्हा एकदा राममंदिराचा प्रश्‍न गाजणार की भाजप हवा काढून घेणार, याची प्रतीक्षा करावी लागेल; मात्र अयोध्येतील महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांना ज्या पद्धतीने खडसावले त्याचे स्वागत केले पाहिजे.

शिवसेनेचे निमंत्रण गिरी यांनी नाकारताना म्हटले आहे, की शिवसेना, विश्‍व हिंदू परिषदेसारख्या संघटना राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करीत आहेत. खरे तर त्यांनी एकत्र यायला हवे. गिरी यांचे म्हणणे योग्यच आहे. रामासाठी शिवसेना, विहिंप, संघ एकत्र का येत नाहीत? वेगळ्या चुली अयोध्येत का मांडल्या जात आहे? 

हे सर्व पक्ष 1992 मध्ये जसे एकत्र दिसले तसे आता का दिसत नाहीत, हा प्रश्‍न आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार अयोध्येत ज्या दिवशी उद्धव ठाकरे येतील तेव्हा देशाला जो काही संदेश जायचा आहे तो जाईलच. केंद्रात मोदी सरकारला बहुमत आहे. सरकारने राममंदिर निर्माणासाठी कायदा करावा. गेल्या पंचवीस वर्षांत शिवसेनेला राम मंदिर का आठवले नाही, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, "पंचवीस वर्षांचा मुद्दा येथे लागू होत नाही. यापूर्वी भाजप सरकारला पूर्ण बहुमत नव्हते. आता सरकार बहुमतात आहे.' 

राऊत यांचे म्हणणे एक वेळ खरे मानले तरी गेल्या चार वर्षांत तरी शिवसेनेने हा मुद्दा हातात घेऊन का धसास लावला नाही. आणखी पाच सहा महिन्यांत निवडणूक आचारसंहिता लागेल. मोदी सरकार पुन्हा बहुमताने येईल किंवा नाही, हे सांगता येत नाही. मात्र गेली चार वर्षे शिवसेना भाजपच्या मांडीला मांडी लावून केंद्रात बसली.

उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस बंद दरवाजाआड एकमेकांशी संवाद साधतात. हे काही लोकांना कळत नाही का? गुप्तगू करताना कधी यांना राम आठवला होता की नाही, हे कळण्यास मार्ग नाही. गेली चार वर्षे सातत्याने शिवसेनेने राममंदिराच्या प्रश्‍नावर आंदोलन केले असते. अयोध्येला गेले असते तर आताच्या अयोध्याभेटीचे निश्‍चितपणे समर्थन करता आले असते. मात्र तसे झाले नाही. 

येथे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. विहिंपचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनीही शिवसेनेचा समाचार घेतला. त्यांनी प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधले असते तर बरे झाले असते. तसे झाले असते तर त्यांच्या राममंदिर उभारणीला बळ मिळाले असते, असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही हिंदुत्ववादी संघटनांचा उद्देश एकच असल्याचेही म्हटले आहे. 

शिवसेनेने अयोध्येचा मुद्दा ज्या पद्धतीने हातात घेतला आह.े तो विहिंपला खूप अपील झाला किंवा नाही झाला तरी शिवसेनेने वातावरण करण्यात तरी यश मिळविले आहे. शिवसेनेमुळे कदाचित उद्या याच मुद्यावर देश पुन्हा एकदा ढवळून निघू शकतो. काही झाले तरी भाजपनंतर केवळ शिवसेना हाच पक्ष हिंदुत्त्वासाठी रस्त्यावर येतो हा संदेशही देशभर जाणार आहे. त्यामुळे संघ आणि त्यांच्या संघटनांनाही हा मुद्दा दृष्टिआड करून चालणार नाही. 

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रभुराम असेल, तर बहुसंख्य हिंदूंबरोबरच परप्रांतीयांनाही यानिमित्ताने चुचकारण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतो. परप्रांतिय मंडळीही या मुद्यावर शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात. उत्तर भारतीयांप्रमाणेच जैन समाजही काहीसा दुखावला होता. याचे परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिसले होते. आता हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून सर्व घटकांना बरोबर घेण्याचा प्रयत्न असेल असे दिसते. 

कदाचित हे गणितही शिवसेनेच्या लक्षात आलेले असावे. मुंबई, ठाणे आदी शहरांचा विचार केल्यास शिवसेनेला या पुढे केवळ मराठी माणसाचा पाठिंबा घेऊन चालणार नाही तर परप्रांतीयांची साथ मिळवावी लागेल. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला तरच फायदा होऊ शकतो. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेविषयी महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही जो काही संदेश जायचा तो जाणार आहे. 

हे सर्व मुद्दे असले तरी गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेना आणि भाजपची मैत्री आहे. अनेक निवडणुका एकत्र लढण्याबरोबरच राम मंदिर, काश्‍मिरप्रश्‍न आदी वादग्रस्त राष्ट्रीय मुद्यावर शिवसेनेचा भाजपला नेहमीच पाठिंबा राहिला आहे. आज भाजपचे जे मित्र आहेत यापैकी शिवसेना सोडली तर एकही पक्ष हिंदुत्त्व मानत नाही. 2019च्या निवडणुकीत कदाचित राम मंदिराचा मुद्दाही हायलाईट होऊ शकतो. दुरावलेले हे मित्र या मुद्यावर एकत्रही आलेले दिसतील. 

हिंदुत्व हा दोन्ही पक्षांना जोडणारा धागा आहे. हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्वचा अभिमान बाळगणारे हे दोन पक्ष एकत्र आले तर आश्‍चर्य वाटायला नको. पटो ना पटो पण, शिवसेनेने एखादे आंदोलन हातात घेतले की समोरच्याला दखल घ्यायला लावतात. मग तो भाजप असो की कॉंग्रेस ! काही असो एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालविला आहे. 

संबंधित लेख