आंबेडकरी चळवळीच्या भाष्यकाराचा मंत्रिपदाने सन्मान 

नव्या पिढीशी संवाद साधणारा नेता, विचारवंत, लढवय्या पॅंथर अविनाश महातेकर यांना सत्तेने सतत तीन वेळा हुलकावणी दिली. त्यांची मंत्री होण्याची संधी हुकली. महातेकर मंत्री होतील असे त्यावेळी सर्वांना वाटले होते. अखेर ते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या खात्याचे मंत्री झाले आहेत. आंबेडकरी चळवळीच्या या भाष्यकाराला मंत्रिपदाने त्यांचा सन्मान झाला आहे.
आंबेडकरी चळवळीच्या भाष्यकाराचा मंत्रिपदाने सन्मान 

दलित, शोषित, कष्टकरी, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या योध्याला अखेर न्याय मिळाला. आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि भाष्यकार अविनाश महातेकर हे सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य या खात्याचे ते मंत्री झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात त्यांना अखेर स्थान मिळाले आहे. खरे त्यांना हे स्थान सहज मिळालेले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने महाराष्ट्रीताल राजकारण ढवळून काढले. तब्बल 41 लाख मते वंचितने मिळविली. 

राज्यातील नऊ मतदार संघात वंचितने एक लाखाहून अधिक मते मिळविली आहेत. विधानसभा निवडणुकीत वंचितचा हा विस्तार अडचणीचा ठरणार हे गेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. त्यामुळे रामदास आठवले यांना नाराज करून चालणारे नाही. हे भाजपच्या लक्षात आले. त्यामुळे केंद्रात आठवले आणि राज्यात महातेकर यांना स्थान द्यावे लागले आहे. आठवले यांनी महातेकर यांची मंत्रिपदासाठी निवड केल्याने रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच गटांतील नेते आणि कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत तसेच इतर राजकीय पक्षांतूनही त्यांचे अभिनंदन होत आहे. 

आंबेडकरी चळवळीतील त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लढणाऱ्या "दलित पॅंथर' या आक्रमक संघटनेचे महातेकर हे संस्थापक सदस्य आहेत. त्या काळी नामदेव ढसाळ, राजा ढाले, भाई संगारे, ज. वि. पवार, अविनाश महातेकर यांच्यासारख्या हजारो झंजार तरूणांनी 1970 च्या दशकात या चळवळीत झोकून दिले. महातेकर यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील "महाते'. 

पॅंथरची 1972 मध्ये स्थापना होण्यापूर्वी ते मुंबईत नोकरीसाठी आले होते. ते भायखळ्याच्या पूर्वेला लवलेन मध्ये रहायचे. घरं छोटी असल्याने येथील तरूण रस्त्यावरच झोपायचे. जगण अत्यंत खडतर. मात्र धर्म, वर्ण विरहित, शोषणमुक्त समाजाचा निर्मितीचा ज्वलंत विचार वस्त्यांवस्त्यांमध्ये हे तरूण पेरत होते. महातेकर यांना रिझर्व बॅंकेत नोकरी लागली. तेव्हा पॅंथर संघटनेच्या तरूणांवर पोलीसांचे लक्ष असायचे. त्यांच्यावर केसेस दाखल व्हायच्या. त्यांचे मुळ नाव अविनाश शरद कांबळे. ते नोकरीला असताना संघटनेत सक्रीय होते. चळवळीचा परिणाम नोकरीवर होवू नये म्हणून त्यांनी आडनाव बदलून त्यात गावाचे नाव लावून महातेकर केले. 

दलितांवरील अत्याचार, राखीव जागांचा लढा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, रिडल्स, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, वरळी दंगलीनंतरचे आंदोलन आदी आंदोलनात त्यांचा हिरीरीने पुढाकार होता. महातेकर हे नाव आंबेडकरी चळवळीत आदराने घेतले जात आहे. या चळवळीत काम करताना त्यांनी तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. साहित्यिक, विचारवंत, प्रभावी वक्ता, आंबेडकरी चळळीचे भाष्यकार अशी त्यांची समाजात प्रतिमा राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्या निवडीचे स्वागत आंबेडकरी जनतेला झाला आहे. 

नामदेव ढसाळ आणि राजा ढाले या नेत्यांनी 1972 मध्ये पॅंथर स्थापन केली. काही वर्षानंतर अंतर्गत वादाने पॅंथर संघटना विभागली. दोन्ही नेत्यांनी वेगळे गट निर्माण केले. पॅथरमध्ये ते राजा ढाले यांच्या सोबत होते. 1976 साली ढाले यांच्या गटातून भाई संगारे आणि महातेकर बाहेर पडून त्यांनी स्वतःचा गट निर्माण केला. पुढे पॅंथर बरखास्तीचा निर्णय, मास मुव्हमेट, भारतीय दलित पॅंथरची निर्मिती, 1990 मधील रिपब्लिकन ऐक्‍य अशी अनेक स्थित्यंतरे या चळवळीत झाली. महातेकर हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत भारिपमध्ये काम करू लागले. 

वेळप्रसंगी सत्ता नाकारली 
रिपब्लिकन ऐक्‍य झाल्यानंतर गटतट विसर्जित झाल्यानंतर ते ऐक्‍यात सहभागी झाले. ऐक्‍यात फुट पडल्यानंतर महातेकर हे रामदास आठवले यांच्यासोबत राहिले. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या सत्तेत त्यांना पश्‍चिम महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मिळाले. लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदार संघातून आठवले यांचा पराभव केला ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी महामंडळाचे हे अध्यक्षपद सोडले. वेळप्रसंगी सत्तेवर लाथ मारण्याची धमक असलेला हा पॅथर त्यावेळी सर्वांना दिसला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिडालोस, शिवशक्ती-भीमशक्ती या राजकीय समीकरणांच्या मांडणीत त्यांनी आठवले यांच्या भुमिकेचे समर्थन करीत त्यांना साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील युतीच्या प्रचाराच्या प्रत्येक सभेत महातेकर यांचे भाषण लक्षवेधी असे. त्यांना पहाडी आवाजीची देणगी आहे. ते चालू घडामोडींवर चिंतन, वाचन, वर्तमानपत्रे, नियतकालिके, यातून स्तंभलेखन करीत आहेत. त्यांचे लेखन दिशादर्शक राहिले आहे. चालू घडामोडींवर त्यांचे चिंतन उद्भोधक असते. महत्वाच्या वाटणाऱ्या वर्तमान पत्रातील बातम्यांची कात्रणे, न्यायालय, सरकारचे निर्णय यावर चिंतन करणे त्यातून स्वतःचे मत आणि पक्षाची राजकीय भुमिका ठरविणे यातून त्यांच्यातील लेखक, तत्वज्ञ, सजग नेता असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडत जातात. 

एवढ्या उंचीचा नेता असून ते सतत सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असतात. कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतात. त्यांची मते जाणून घेतात. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतात. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. नव्या पिढीशी संवाद साधणाऱ्या लढवय्ये पॅंथर महातेकर यांना सत्ता सलग तीन वेळा हुलकावणी देत राहिली. दयानंद म्हस्के, पितमकुमार शेगावकर, सुमंतराव गायकवाड यांना विधानपरिषदेवर घेतले. तेव्हा महातेकर यांना संधी मिळेल, असे सर्वांना वाटले. सत्तेत अखेर त्यांचा सहभाग झाला. ते मंत्री झाले. आंबेडकरी चळवळीच्या या भाष्यकाराला मंत्रीपद देवून त्यांचा सन्मानच झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com