AVANI tiger case inquiry devendra fadanvice | Sarkarnama

"अवनी' प्रकरणाच्या घटनाक्रमाचा तपास करणार ः मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघीणीला वन विभागाने ठार मारल्याच्या प्रकरणी या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करण्यात येईल, यात काही दोष आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. तसेच वाघीणीच्या मृत्यूमुळे आपणांस दुःख झाल्याचे फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

राज्यसरकारच्या आदेशानंतर यवतमाळमध्ये अवनी वाघिणीला शुक्रवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच सरकारच्या या गोळीबाराची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्री आणि वन्यजीवप्रेमी मनेका गांधी या तर मुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री मुनगंटीवार यांच्यावर कमालीच्या संतापल्या आहेत. 

कायदेशीर आणि राजकीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात येईल असा इशारा देतानाच अवनीच्या एन्काऊंटरची सुपारी एका गॅंगस्टरला देण्यात आली होती, असा गंभीर आरोप मनेका गांधी यांनी केला आहे. अवनीची हत्या झाल्याचा आरोप करत प्राणिप्रेमींनी निषेध व्यक्त केलेला असतानाच मनेका गांधी यांनीही ट्विट करून या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मनेका यांनी संताप व्यक्त करताना एका पाठोपाठ एक ट्‌वीट केले आहे. 

मनेका म्हणाल्या, शाफत अली यांनी आतापर्यंत तीन वाघ, दहा बिबटे, काही हत्ती आणि 300 रानडुकरे मारली आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असतानाही फडणवीस सरकारने अवनीच्या एन्काऊंटरची सुपारी त्यांनाच का दिली ? असा सवाल गांधी यांनी केला आहे. 

मनेका गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर स्पष्टिकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, वाघीला ठार मारण्याच्या घटनाक्रमाचा तपास करण्यात येईल. मनेका गांधी मंत्री असल्या तरी त्या प्राणीप्रेमी आहेत. त्या सातत्याने असे विषय अत्यंत संवेदनशीलतेने मांडत असतात. त्यामुळे या घटनेवरून ज्या शंका उपस्थित झाल्या आहेत. त्याचा योग्य तपास करून कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

संबंधित लेख