मेनकाबाई, माणसं मेली तर चालतील पण, नरभक्षक वाघिन वाचली पाहिजे का ? 

अवनीला ठार मारल्यानंतर मेनकाबाई आणि तथाकथित पर्यावरणवाद्यांचा मानवतावाद उफाळून आला आहे. तो चुकीचा आहे. एका नरभक्षक वाघिनीला ठार मारल्याचे जेवढे दु:ख ही मंडळी व्यक्त करीत आहेत तशी हळहळ तिच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर का व्यक्त केली गेली नाही. अवनीचे दु:ख आहेच पण, तिने घेतलेल्या बळीचे काय ?
मेनकाबाई, माणसं मेली तर चालतील पण, नरभक्षक वाघिन वाचली पाहिजे का ? 

थोर समाजसेवक प्रकाश आमटे यांचे प्राणिप्रेम सर्वश्रुत आहे. आदिवासी आणि दुर्गम भाग असलेला हेमलकसा हीच त्यांनी आपली कर्मभूमी मानली. तेथील वाघ, सिंह, साप, पशुपक्षी हे त्यांचे परममित्रच. वाघाबरोबर दंगामस्ती करणे हे एैऱ्यागैऱ्याचे काम नाही. माणसाप्रमाणेच प्राण्यांचेही मन जिंकणारे म्हणून आमटे मोठे वाटतात. त्यांच्याविषयी समाजाला नेहमीच कुतूहल वाटत आले. 

आज जगभर प्राणिमात्रांवर दया करा असा संदेश दिला जात आहे. कोणत्याही प्राण्याची हत्या करणे कायद्याने गुन्हा मानला आहे आणि त्यासाठी विशेषत: भारतात कठोर कायदा केला आहे. सलमान खानला काळविटप्रकरण किती महाग पडले हे ताजे उदाहरण आहे. ज्या प्राण्यांचा मानवाला उपद्रव नाही किंवा भीती नाही. जे प्राणी जंगलात स्वातंत्र्य उपभोगतात त्यांची शिकार करणारा माणूस म्हणजे खुनीच. अवनीच्या मुद्यावर तथाकथित पर्यावरणवादी आणि भाजपविरोधकांनी बेंबीच्या देठापासून बोंब ठोकायला जी सुरवात केली आहे त्याची कीव करावीशी वाटते. 

गेल्या दोन वर्षात अवनी या नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला होता. तिने तेराजणांचा आतापर्यंत बळी घेतल्याचीही चर्चा आहे. या संदर्भात अहवाल किंवा तपास काय सांगतो. हे बळी तिनेच कशावरून घेतले. असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. अवनीने दहशत निर्माण केली होती. जंगलात जाण्यास कोणी धजावत नव्हते. अवनीची आठवण काढली तरी तेथील आदिवासींच्या अंगावर काटा उभा राहत होता. जंगलचे राजे म्हणून आदिवासींकडे पाहिले जाते. शेती, कंदमुळे, डिंक, मध, सरपण हे त्यांच्या चरितार्थाचे साधन. जव्हार, मेळघाट असो की यवतमाळचं जंगल असेल. या जंगलात फिरणाऱ्या आदिवासींकडे पाहिले तर लक्षात येईल त्याच्या खांद्यावर कुऱ्हाड, हातात गलोल (कोकणात बेचकी म्हणतात) असते. शेळ्यामेंढ्या, गाईम्हैशी हिंडवायला तो जंगलात जातो आणि मावळतीला घरी परततो. जंगल हे ज्यांचे जगण्याचे साधन आहे. 

वाघवाघिनींचा वावर असलेल्या भागात प्रतिबंधात्मक आदेशही असतो. पण, आदिवासींचा जंगलात गेल्याशिवाय दिवसच जात नाही. आता त्याच जंगलात जर कोणी धुमाकूळ घालत असेल त्याचा बंदोबस्त करणे हे गावकऱ्यांचे आणि सरकारचे कामच असते. 

अवनी वाघिनीला ठार मारल्यानंतर केंद्रीय महिला, बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांच्यासह देशभरातील तथाकथित पर्यावरणप्रेमींनी जो थयथयाट सुरू केला आहे तो समर्थनीय नाही. खरेतर एका वाघिनीला म्हणजेच मुक्‍या प्राण्याला ठार मारणे चुकीचे आहे. पण, जी चवताळेली वाघीण एक असो की तेरा लोकांचा प्राण घेते त्यांच्याविषयी या ढोंगी माणसांना का दयामाया वाटत नाही. 

आपल्याकडे काही वर्षापूर्वी वन्यप्राण्यांची शिकार केली जात असे. वन्यप्राण्यांच्या अवयवाची तस्करीही केली जात असे आणि त्यातून अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असे. वन्यजीव कायदा लागू झाल्याने शिकार जवळजवळ थांबली आहे. प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना कठोर शासन केले जाते त्यामुळे शिकारी आता नामशेष होत आहे. वर्षानुवर्षाच्या शिकारीमुळे काही वन्यप्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ही संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा पशुप्राण्यांविषयी मेनका गांधी यांना प्रचंड प्रेम,जिव्हाळा आहे. याचा आनंदच आहे. 

दिवसेंदिवस घनदाट जंगले कमी होऊ लागली. जंगलतोडीमुळे वन्यप्राणी अन्नपाण्याच्या शोधासाठी सैरभैर होत आहेत.वन्यप्राणी आता शहर, गावात येऊ लागले. मिळेल ती शिकार करून पोट भरण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्रही पुढे येत आहे. हे सर्व खरे असले तरी ज्या अवनीने ज्यांचा बळी घेतला आहे त्यांच्याविषयी मेनकाबाईंचे काळीज का पिळवटत नाही. अवनीने बळी घेतलेल्या कुटुंबियांना का मदत केली नाही. वास्तविक, अवनीला ठार मारायला नको होते. हे खरे असले तरी एखादी गोष्ट हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यानंतर ऍक्‍शन ही घ्यावीच लागते. अवनीला मारायला शार्पशुटर मागविला. त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याचेही स्पष्ट होत आहे. याबाबतची चौकशी सरकारने करावी.मात्र लोकांच्या जिवाचे रक्षण करणे हे ही सरकारचे कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही. 

याच अवनीला पकडण्यासाठी सरकारने किती पैसा खर्च केला हे ही लक्षात घेतले पाहिजे. या प्रकरणाची चौकशी सरकार करेल. पण, अवनीच्या मुद्यावर भाजप विरोधकांनी जो गळा काढायला सुरवात केली आहे ते हास्यास्पद आहे. शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनीही वनखात्याचे नाव बदला आणि शिकार खाते ठेवा असे म्हटले आहे. शिवसेनेचे आणि वाघाचे नाते सर्वश्रुतच. शिवसेनेच्या पक्षाचे चिन्हच वाघ. त्यामुळे जगातल्या कोणत्याही वाघाला जखमी किंवा ठार केले तर त्यांच्या भावना समजण्यासारख्या आहेत. मात्र युवराजांनी याच वाघिनीने बळी घेतल्यानंतर कधी ट्‌विट केल्याचे ऐकीवात नाही. असो. शिवसेनेलाही हल्ली ध्यानीमनी फक्त भाजपच दिसत असल्याने विरोध करायला काही तरी कारण हवे असते. आता त्यांना अवनी सापडली इतकेच. शिवसेनेपाठोपाठ आता कॉंग्रेससह इतर पक्षही भाजप विरोधासाठी पुढे सरसावले तर आश्‍चर्य वाटायला नको. 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी स्पष्टीकरण देताना जे सांगितले आहे ते लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणाले, की प्राण्याचे रक्षण करीत असताना माणसांचा बळी जावा ही आमची भूमिका नाही. नरभक्षक अवनीला मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता पण, तिने वनरक्षकांवरच हल्ला चढविल्याने त्यांच्या रक्षणासाठी अवनीवर गोळ्या झाडाव्या लागल्या. मुनगंठीवार आणि मेनकाबाई एकाच पक्षात आहेत. तरीही सुधीरभाऊंनी या मुद्यावर जी कणखर भूमिका घेतली आहे त्याचे स्वागत आहे. 

मेनकाबाई आणि तथाकथित पर्यावरणवाद्यी एका बाजूने मानवतावाद दाखवीत आहे. अवनीला ठार मारल्याचे जेवढे दु:ख ते व्यक्त करीत आहेत तशीच हळहळ तिने बळी घेतलेल्यांविषयी का व्यक्त केली जात नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com