aurangabad zp | Sarkarnama

औरंगाबादमधल्या नेत्याचे लक्ष मुंबईकडे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद ः जिल्हा परिषदेत भाजप 23 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. 18 सदस्यांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र येणार की नाही ? मुंबईतील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडेच स्थानिक नेत्यांचे डोळे लागले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी संपणार असल्यामुळे शिवसेना-भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते रिलॅक्‍स झाले आहेत. 

औरंगाबाद ः जिल्हा परिषदेत भाजप 23 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. 18 सदस्यांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र येणार की नाही ? मुंबईतील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडेच स्थानिक नेत्यांचे डोळे लागले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी संपणार असल्यामुळे शिवसेना-भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते रिलॅक्‍स झाले आहेत. 

जिल्हा परिषदेची सत्ता सेना-भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून खेचून आणली आहे. पण स्पष्ट बहुमत कुणालाच न मिळाल्यामुळे एकमेकांची साथ घेतल्याशिवाय सत्तेचे तोरण बांधता येणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीतील जागा वाटपावरून युती तुटली ती राज्यभरात. त्यानंतर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना आपली औकात आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीला त्यांची जागा कळली. भाजप मुंबई वगळता इतर ठिकाणी नंबर एकचा पक्ष ठरला. आता मुंबईच्या जोरावरच भाजपला राज्यात इतर ठिकाणी झुकवायचे आणि सत्तेचे इमले बांधायचे अशी खेळी शिवसेनेकडून खेळली जात आहे. मात्र सत्तेच्या या स्पर्धेत आकड्यांचे गणित जुळवण्यासाठी बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईत बसलेले पक्षाचे "आका' काय निर्णय घेतात याकडे सगळ्या पक्षांचे नेते लक्ष लावून आहेत. 

जिल्हा परिषदेत मतदारांनी भाजप-शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. 62 पैकी 41 जागा या पक्षांच्या पारड्यात आल्या आहेत. पण युती नसल्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कुणी पुढाकार घ्यायचा हा प्रश्‍न होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी शिवसेनेला टाळी देत सोबत येण्याचा प्रस्ताव देऊन टाकला आहे. कारण संख्याबळाच्या आधारावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे भाजपकडे जाणार आहे. शिवसेनेने मात्र या टाळीला उत्तर दिलेले नाही. मुंबईतील महापौर निवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय भाजप किंवा इतर पक्षांच्या बाबतीत घेतील तोच पॅर्टन खाली राबवला जाईल हे स्पष्ट आहे. त्यामुळे निर्णय पक्षप्रमुख घेतील हे एकमेव उत्तर शिवसेनेकडून दिले जात आहे. 
कॉंग्रेसही युतीच्या निर्णयावर अवलंबून 
जिथे जिथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकते अशा सर्व ठिकाणी आघाडी करण्याचा निर्णय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला आहे. पण जिथे दोघे मिळूनही सत्ता येऊ शकत नाही तिथे कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी वेट ऍन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. मुंबईत जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी औरंगाबादेत केली जाईल असे कॉंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितले. 

संबंधित लेख