Aurangabad SP Interview | Sarkarnama

नक्षलग्रस्त भागातील पोस्टींग आव्हान म्हणून स्वीकारले- डॉ. आरती सिंह

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

संधीला मी आव्हान म्हणून स्वीकारले आणि तीन वर्ष नक्षलग्रस्त भागात यशस्वीरित्या काम केले..... औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगत होत्या. महिलांची सामाजिक सुरक्षा, प्रशासकीय सेवेत त्यांची गरज यासह अनेक विषयावर त्यांनी 'सरकारनामा'शी केलेली ही चर्चा.....

औरंगाबाद : एकीकडे आपण स्त्री पुरूष समानतेची भाषा करतो, मग पोलीस दलात काम करताना जोखमीची जबाबदारी महिला पोलीस अधिकाऱ्यांवर का नको? आयपीएस परीक्षा पास झाल्यानंतर महाराष्ट्र केडरमधून माझी पोलीस दलात निवड झाली. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर सहायक पोलीस अधिक्षक म्हणून पहिली नेमणूक नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडला झाली. महिला अधिकारी इथे काम करु शकेल का? अशा शंका डिपार्टंमेटमधील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. पण या संधीला मी आव्हान म्हणून स्वीकारले आणि तीन वर्ष नक्षलग्रस्त भागात यशस्वीरित्या काम केले..... औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगत होत्या. महिलांची सामाजिक सुरक्षा, प्रशासकीय सेवेत त्यांची गरज यासह अनेक विषयावर त्यांनी 'सरकारनामा'शी केलेली ही चर्चा.....

प्रश्‍न : एमबीबीएस केलेले असतांना पोलीस दलात कशा आल्या?
डॉ.सिंह : मी मुळ उत्तर प्रदेशातील मिरजापूर जिल्ह्यातील. शेतकरी कुटुंबात जन्माला आले असले तरी आमच्या घरात शिक्षणाची परंपरा होती. वडील शेती करायचे; आई शिक्षिका होती. मोठी बहीण डॉक्‍टर तर लहान भाऊ इंजिनिअर आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर मी उच्च शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून पूर्ण केले. एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोन वर्ष वाराणसी येथे डॉक्‍टर म्हणून रुग्णसेवा केली. तेव्हाचा एक प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. आमच्या हॉस्पीटलमध्ये ग्रामीण भागातील एक महिला बाळंतपणासाठी भरती झाली होती. तिचे सगळे नातेवाईक जमले होते. त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याचे सिस्टरने कुटुंबियांना सांगितले; तेव्हा त्यांच्या तोंडावर निराशा पसरली. हे पाहून मला आश्‍चर्य वाटले. मुलगी जन्मदात्यांनाच ओझे का वाटते? हा प्रश्‍न मला पडला. मुली मुलांपेक्षा कमी नाही हे सिध्द करण्याचा ठाम निश्‍चय तेव्हाच केला आणि पोलीस दलात जाण्याचा निर्णय घेतला.

प्रश्‍न : पहिली नियुक्ती थेट गडचिरोलीला झाल्याने दडपण होते का?
डॉ. सिंह : मुळात पोलीस दलात आल्यानंतर आम्हाला जे प्रशिक्षण दिले जाते, त्यात कुठल्याही परिस्थीतीत आणि दुर्गम भागात काम कसे करावे याची ट्रेनिंग दिली जाते. 2008 मध्ये पोलीस दलात आल्यानंतर औरंगाबादेत दोन महिने मी प्रशिक्षण घेतले आणि माझी पोस्टींग गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडला झाली. या भागात नियुक्ती होणारी राज्यातील मी पहिली महिला पोलीस अधिकारी ठरले. मिळालेली ही संधी आव्हान म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि रुजू झाले.

प्रश्‍न : नक्षलग्रस्त भागात काम करतांनाचा अनुभव कसा होता?
डॉ.सिंह : भामरागड हे महाराष्ट्रच्या सीमेवरील शेवटचे गाव, त्यानंतर छत्तीसगड राज्य सुरु होते. या भागात मोठ्या प्रमाणात नक्षली कारवाया होत होत्या. केवळ त्या रोखणे एवढेच माझ्यासमोर उद्दिष्ट नव्हते तर नक्षलवादी झालेल्या किंवा त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुण, महिलांना आत्मसर्मपण योजनेअंतर्गत मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान होते. तीन वर्षाच्या काळात नक्षलवाद्यांशी अनेकदा दोन हात करावे लागले. एन्कान्ऊटर, शस्त्रांचे साठे जप्त करणे या नियमित कारवाया सुरु असतांनाच या भागातील आदिवासी लोकांना शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार आणि जमिनीचे पट्टे मिळवून देण्याचे काम शासनाच्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून केले. शिक्षित असून देखील रोजगार उपलब्ध होत नसल्याने या भागातील अनेक तरुण नक्षलवादी कारवायांकडे वळायचे. राज्य सरकारच्या पुढाकाराने अशा तरूणांना पोलीस दलात भरती करण्याची मोहिम यशस्वी ठरली.

प्रश्‍न : महिलांची सामाजिक सुरक्षा धोक्‍यात आली आहे?
डॉ. सिंह : महिलांवरील वाढते अत्याचार रोखून त्यांची सामाजिक सुरक्षा अबाधित राखण्याची जबाबदारी जेवढी पोलीस प्रशासनाची आहे तेवढीच ती समाज म्हणून प्रत्येक नागरिकाचीदेखील आहे. पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय निर्माण झाला तरच महिलांवरील अत्याचार रोखण्याच्या प्रयत्नांना यश मिळू शकेल. एखाद्या गुन्ह्याची किंवा अत्याचाराची माहिती देण्यासाठी पोलीस स्टेशनला येणाऱ्या महिला किंवा नागरिकाला भिती वाटता कामा नये, आपल्याला इथे चांगली वागणूक आणि न्याय मिळेल असा विश्‍वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.

प्रश्‍न : तरुणींनी आयपीएससारख्या स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी?
डॉ. सिंह : आयपीएस स्पर्धा परिक्षेचा अभ्यास कठीण आहे, पण अशक्‍य नाही हे मी सर्वप्रथम तरुण-तरुणींना सांगू इच्छिते. पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील प्रश्‍न विचारले जातील म्हणून आपण त्या सगळ्याच पुस्तकांचा अभ्यास करतो का? तर नाही. स्पर्धा परिक्षांची तयारी करतांना आधी अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा. परीक्षेत कुठल्या प्रकारचे प्रश्‍न येतात यावर लक्ष देऊन व्यवस्थीत तयारी केल्यास यश मिळणे अवघड नाही. सरसकट अभ्यास करण्याच्या नादात ज्या प्रश्‍नांची तयारी झालेली असते त्यांची उत्तर देखील ऐनवेळी आठवत नाहीत. हे टाळण्यासाठी अभ्यास करतांना प्रश्‍नांची निवड आणि त्यांचा अभ्यास काळजीपूर्वक केल्यास यश हमखास मिळतेच.

प्रश्‍न : पोलीस व प्रशासकीय सेवेत महिला तरुणींनी यावे का?
डॉ. सिंह : निश्‍चितच पोलीस दलात महिलांची गरज आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात महिला, तरुणी पोलीस दलात येतील तेवढा सर्वसामान्य महिलांचा विश्‍वास वाढेल. आज कौटुंबिक अत्याचार असो, की इतर महिलांवरील अत्याचार या विरोधात आवाज उठवण्यास आजही स्त्रिया पुढे येताना दिसत नाहीत. बदनामी आणि पोलीसांचा ससेमिरा नको अशी त्यांची भावना असते. पण पोलीस दलात महिलांची संख्या अधिक असेल तर महिलांचे मनोबल वाढण्यास निश्‍चितच मदत होईल. केवळ महिलांची समाजिक सुरक्षा म्हणूनच नाही, तर एकंदरित महिला व समाजाच्या विकासासाठी प्रामुख्याने महिला व तरुणींनी पोलीस दल व इतर प्रशासकीय सेवेत आलेच पाहिजे.

संबंधित लेख