aurangabad shivsena and bjp | Sarkarnama

औरंगाबादच्या महापौर निवडणुकीत भाजपकडून भूकंपाची तयारी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 जुलै 2017

औरंगाबाद : भाजपचे महापौर भगवान घडामोडे यांचा वर्षभराचा कार्यकाळ येत्या ऑक्‍टोबरमध्ये संपणार आहे. त्यानंतर शेवटची अडीच वर्ष महापौरपद शिवसेनेकडे राहील. युतीत ठरलेल्या करारानुसार सगळे काही सुरळीत पार पडले तरच हे शक्‍य होणार आहे. परंतु शिवसेना-भाजपमधील संबंध पाहता तीन महिन्यांनी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का देत राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत भाजप असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हेच या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद : भाजपचे महापौर भगवान घडामोडे यांचा वर्षभराचा कार्यकाळ येत्या ऑक्‍टोबरमध्ये संपणार आहे. त्यानंतर शेवटची अडीच वर्ष महापौरपद शिवसेनेकडे राहील. युतीत ठरलेल्या करारानुसार सगळे काही सुरळीत पार पडले तरच हे शक्‍य होणार आहे. परंतु शिवसेना-भाजपमधील संबंध पाहता तीन महिन्यांनी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का देत राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत भाजप असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हेच या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने नगरसेवक असलेली भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत शिरू पाहत आहे. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 29 तर भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले होते. या वाढत्या संख्याबळानूसार सत्तेतील वाटा मिळावा यासाठी युतीमध्ये करार झाला. पहिले दीडवर्ष महापौरपद शिवसेनेकडे, त्यानंतर एक वर्ष भाजप आणि उर्वरित अडीच वर्ष पुन्हा शिवसेनेचा महापौर असा फार्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केला आहे. त्यानुसार शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी महापौरपद भूषवल्यानंतर भाजपचे भगवान घडामोडे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. 

तुपे यांनी दोन महिने राजीनामा उशीरा दिल्याने भाजपच्या वाट्याला दहा महिनेच आले. पण या दहा महिन्यात शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजुर करून आणत भाजपने मास्टर स्ट्रोक लगावल्याचे बोलले जाते. निधी आणल्याचे श्रेय लाटण्या बरोबरच भाजपचे आमदार व नगरसेवकांच्या वार्डातील सर्वाधिक रस्त्यांचा समोवश यादीत करण्याची खेळी देखील केली जात आहे. 

दरम्यान, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना व आता शंभर कोटी रुपयांच्या निधीचे श्रेय आणि त्यातून तयार होणाऱ्या रस्त्यांच्या यादीवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. कुरघोडी आणि एकमेकांना शह देण्याच्या राजकारणातूनच आगामी महापौर निवडणुकीत भूंकप घडवण्याची तयारी भाजपकडून सुरु असल्याचे बोलले जाते. 

अपक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा 
ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक नंदकुमार घोडेले व पालकमंत्र्यांच्या मर्जीतील माजी महापौर विकास जैन यांच्या नावाची चर्चा आहे. पण तीच ती नावे पुन्हा नको म्हणत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्थायी समिती सभापतीपदासाठी मोहन मेघावाले यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता. 

मातोश्रीवरून घोडेले, जैन यांच्या नावावरफुली मारली जाऊ शकते. ही शक्‍यता गृहीत धरून शिवसेनेकडून मनिषा लोखंडे या नवख्या नगरसेविकेचे नाव देखील महापौरपदाच्या शर्यतीत घेतले जात आहे. इकडे शिवसेनेत महापौरपदासाठी लॉबिंग सुरु असतांना तिकडे भाजपमध्ये मात्र अपक्ष नगरसेवक व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरु असल्याचे कळते. 

युती असल्याने शिवसेनेच्या विरोधात थेट भाजपचा उमेदवार महापौरपदासाठी देता येणार नाही, म्हणून अपक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर निशाणा साधण्याची चाल खेळली जात आहे. एमआयएम व अपक्षांच्या मदतीने हा डाव यशस्वी झाला तर महापालिकेच्या राजकीय इतिहासात हा भूकंपच ठरणार आहे. 

शिवसेनाही सावध 
भाजपकडून दगाफटका होऊ शकतो याची जाणीव असल्यामुळे शिवसेना देखील सावध पावले टाकत आहे. तशी वेळ आली तर साम, दाम, दंड भेदाचा वापर करू शकेल असाच उमेदवार शिवसेनेला मैदानात उतरवावा लागेल. मग घोडेले, जैन यापैकी एका नावाला मातोश्रीचा आर्शिवाद मिळू शकतो. एकूणच ऑक्‍टोबरमध्ये होणारी महापौरपदाची निवडणुक रंजक आणि राजकीय उलथापालथ करणारी ठरण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेतील पक्षीय बलाबल 
--------------------------- 
शिवसेना- 29 एमआयएम-25 भाजप- 23 कॉंग्रेस- 09 राष्ट्रवादी- 03 
इतर- 24 

संबंधित लेख