...आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेचे नगरसेवक पक्षनेत्यांवरच भडकले

 ...आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेचे नगरसेवक पक्षनेत्यांवरच भडकले

औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांमध्ये असलेली धुसफूस आज पुन्हा सर्वसाधारण सभेतही दिसून आली. शिवसेनेचे नगरसेवक आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर भडकले. ठरावीक वॉर्डातच कामे होतात, आम्ही काय लोकांची फक्त बोलणी खायची का? अशा शब्दांत ज्येष्ठ नगरसेवक सीताराम सुरे यांच्यासह इतर नगरसेवकांनी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन यांना प्रश्‍न केला. 

महानगरपालिकेत शिवसेना नगरसेवकांमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू आहे. सोमवारी स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांच्या विरोधातच बंड पुकारल्यानंतर आज आणखी काही नगरसेवकांनी थेट महापौर, सभागृह नेत्यांनाच सुनावले. नगरसेवक सुरे यांनी आपल्या वार्डात विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करतांना फक्‍त तुमच्याच वॉर्डातील विकास कामे होतात, आमच्या वॉर्डातील कामांसाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तर ते ऐकत नाहीत. आम्ही किती दिवस गप्प बसायचे, नागरिकांच्या शिव्या खाण्यासाठी इथे आलो का म्हणत संताप व्यक्त केला. 

भडकलेल्या सुरे यांची समजूत काढण्याचा विकास जैन यांनी प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. महापौरांनीही सुरे यांना बोलू द्या अशी सूचना केली. त्यानंतर आत्माराम पवार, मीना गायके यांनीही सुरे यांची री ओढत पाइपलाइनची कामे का होत नाहीत याचा जाब विचारला. आपल्या सोबतीला इतर नगरसेवक आल्यामुळे सुरे यांना बळ आले आणि पुन्हा जागेवरून उठत अधिकारी सभागृह नेत्याचेही ऐकत नाही असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेच्या नगरसेवकांकडून घरचा आहेर, तोही जाहीरपणे मिळाल्यामुळे विकास जैनही संतापले. "आतापर्यंत प्रेमाने वागत आलो, पण आता नाही, यापुढे केवळ शिवसेना स्टाईलनेच काम होईल, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा दम त्यांनी भरला. वातावरण अधिक गरम होऊ नये याची काळजी घेत महापौर घोडेले यांनी मग सभाच आटोपती घेतली. 

अधिकाऱ्यांचे अंतर्गत राजकारण 
पाइपलाइनचे कामे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि उप अभियंता सरताजसिंग चहल यांच्यातील अंतर्गत राजकारणामुळेच होत नसल्याचा आरोप करत विकास जैन यांनी आपले बालंट अधिकाऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. चहल प्रमुख असताना त्यांनी कामे मंजूर केली, आता कोल्हे प्रमुख आहेत ते कामे अडवून ठेवत असल्याचा आरोपही विकास जैन यांनी केला. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी या संपुर्ण वादावर "कामे होत नसतील तर नगरसेवकांचा राग सहाजिक आहे, लवकरच बैठक घेऊन कामांचा आढावा घेऊ असे सांगत वादळ शांत करण्याची भूमिका निभावली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com