aurangabad shivsena | Sarkarnama

पक्षप्रमुखांच्या आदेशानेच सेना कॉंग्रेस सोबत 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017

पंचायत समिती सभापती निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेस सोबत गेली ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच असा खुलासा शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

औरंगाबाद : पंचायत समिती सभापती निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेस सोबत गेली ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच असा खुलासा शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. येत्या 21 मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे देखील खैरे यांनी स्पष्ट केले 

मराठवाड्यातील बहुतांश पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेसने युती केली. यावर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे बोलले जात होते. परंतु कॉंग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच घेतला होता व तसे आदेश आम्हाला
दिले होते अशी कबुली खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी दिली. शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या वाहन रॅलीच्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हीमाहिती दिली. याशिवाय शिवसेना यापुढे गल्ली ते दिल्लीपर्यंत शिवशाही आणणार असल्याचे ते म्हणाले. 

जिल्ह्यात भाजपचे आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढली असली तरी शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्यामुळेच भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणे शिवसेनेला कदापी मान्य नाही. किंबहुना भाजप सोबत युती करून जिल्हा परिषदेत पुढील पाच
वर्ष उपाध्यक्ष पद घेऊन फरफटत जाण्याची शिवसेनेची मुळीच इच्छा नाही. या उलट कॉंग्रेसशी युती करून औरंगाबाद, जालना व हिंगोली या तीन ठिकाणचे अध्यक्षपद मिळवण्याचा प्रयत्न सेनेकडून सुरू आहे.

जास्त सदस्य संख्येच्या जोरावर भाजपने अध्यक्षपदावर दावा सांगितला असला तरी त्याला शिवसेनेचा पाठिंबा आवश्‍यक होता. पण शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली असल्यामुळे भाजपची मोठी गोची झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात शिवसेनेने शिवजयंती दणक्‍यात
साजरी करत जोरदार शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. 

संबंधित लेख