Aurangabad Politics Sanjay Shirsat - Haribhau Bagde - Kalyan Kale | Sarkarnama

कचरा प्रश्नावर संजय शिरसाट यांचा हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळेंवर हल्लाबोल

जगदीश पानसरे : सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 8 मार्च 2018

शहरातील कचरा प्रश्‍न चिघळायला फुलंब्री मतदारसंघातील दोन नेत्यांचे भांडण जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेचे अध्यक्ष, फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे व कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या ठपका ठेवला आहे.

औरंगाबाद :  शहरातील कचरा प्रश्‍न चिघळायला फुलंब्री मतदारसंघातील दोन नेत्यांचे भांडण जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेचे अध्यक्ष, फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे व कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या ठपका ठेवला आहे. या दोन नेत्यांच्या भांडणाचाच हा परिणाम असल्याचे सांगत कचऱ्याच्या प्रश्‍नावर हे दोघेही राजकारण करत असल्याची तोफ शिरसाट यांनी "सरकारनामाशी' बोलतांना डागली . 

शहरातील कचरा आंदोलनाला बुधवारी (ता. 7) हिंसक वळण लागले. पडेगाव, मिटमिटा येथील ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या पेटवून देत केलेल्या तोडफोडीला पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि हवेत गोळीबार करत प्रत्युत्तर दिले. आंदोलकांच्या दगडफेकीत 25 पोलीस तर पोलीसांच्या लाठीहल्यात शेकडो नागरीक देखील जखमी झाले. 

हा प्रकार घडला तो मिटमिटा, पडेगाव भाग शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात येतो. "महापालिकेचा कचरा माझ्या मतदारसंघात आणू देणार नाही' अशी भूमिका घेत बळाचा वापर केल्यास जनआंदोलन केले जाईल असा इशारा आ . शिरसाट यांनी  काही दिवसांपुर्वीच दिला होता. मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. 

दरम्यान, बुधवारी कचऱ्याच्या गाड्या मिटमिटा भागात नेत असतांना पडेगाव आणि मिटमिट्याच्या ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोध केला आणि त्यातून पुढील प्रकार घडला. या घटनेनेतर अधिवेशनात असलेले आमदार संजय शिरसाट आज शहरात दाखल झाले आणि त्यांनी महापालिका प्रशासन, पोलीस आणि फुलंब्री मतदारसंघातील आजी-माजी नेत्यांवर जोरदार टीका केली. 

आंदोलकांना घेरून मारले 
महापालिका प्रशासनाने पोलीसांना हाताशी धरून एखादी धाड टाकावी अशा पध्दतीने आंदोलकांना घेरून मारल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला. पाचशे पोलीसांना सोबत घेऊन पालिका प्रशासनाने गावकऱ्यावर दबाव टाकला. पोलीसांनी देखील आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करत ज्यांचा आंदोलनाशी संबंध नाही अशा इतर बाराशे लोकांची नावे आंदोलकांच्या यादीत टाकल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. 

आंदोलकांची धरपकड करतांना पोलीसांनी नागरिकांच्या अनेक वाहनांची मोडतोड केली, घरात घुसून टीव्ही फोडल्याचा आरोप करत पोलीसांची दडपशाही अशीच सुरू राहिली तर मोठे जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा देखील शिरसाट यांनी दिला आहे. 

कचऱ्याचा प्रश्‍न कुणी पेटवला? नारेगांव, मांडकी येथील ग्रामस्थांना कुणी फूस लावली? हे जगजाहीर आहे. फुलंब्री मतदारसंघातील दोन नेत्यांच्या भांडणाचे परिणाम आज शहरासह ग्रामीण भागातील लोकांना भोगावे लागत असल्याचा पुनरूच्चार संजय सिरसाट यांनी केला. कचऱ्याचा प्रश्‍न सोडवण्याचे श्रेय घेण्यासाठी जर कुणी हा प्रकार करत असेल तर श्रेय कुणीही घ्या पण कचऱ्याची विल्हेवाट लावा ,अशी भूमिका शिरसाट यांनी घेतली. 

भाजप नामानिराळी 
कचरा कुठे टाकयाचा या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरता तोडगा काढत खदाणीचा पर्याय सूचवला आहे. यावरून शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कचऱ्याच्या प्रश्‍नावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केल्याचा आरोप सुरूवातीपासूनच केला जातोय. कचरा डेपोची जागा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात येते. 

भाजपचे बापू घडामोडे महापौर असतांना ऑक्‍टोबर 2017 मध्ये हरिभाऊ बागडे यांनी पुढाकर घेऊन आंदोलकांकडून सहा महिन्याची मुदत घेऊन हा प्रश्‍न मोठ्या चलाखीने पुढे ढकलला होता. बापू घडामोडे यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपून शिवसेनेचे नंदकुमार घोडेले महापौर होणार होते. 

त्यामुळे कचरा प्रश्‍नांचे बालंट शिवसेनेच्या गळ्यात टाकण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली. त्यामुळेच हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुर्वचे आमदार अतुल सावे यांनी कचरा प्रश्‍नापासून स्वःताला दूर ठेवले. 

महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असल्यामुळे कॉंग्रेसने देखील कचऱ्याच्या गंभीर प्रश्‍नाकडेही राजकीय दृष्टीतूनच पाहिले. कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे आंदोलकां सोबत मंडपात वेगळी भूमिका मांडायचे आणि पडद्या मागून हा प्रश्‍न कसा पेटता राहील यासाठीच प्रयत्न करत होते असा आरोप देखील केला जातोय. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्र्यांसमोर आंदोलनस्थळी हजेरी लावण्याचा केवळ सोपस्कार पार पाडल्याचे बोलले जाते. 
 

एकंदरित कचऱ्याच्या प्रश्‍नावर राजकारण करत भाजपने आधी हा प्रश्‍न चिघळत ठेवला आणि आता मुख्यमंत्र्यांनी खदानीचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने तो सोडवल्याचे श्रेय देखील लाटण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

संबंधित लेख