Aurangabad Politics Maharashtra Rajiv Satav | Sarkarnama

काँग्रेस खासदार सातव यांच्या हातून 'कमळ' फुलले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सातवांनी रिमोटची कळ दाबली आणि व्यासपाठासमारे ठेवलेले बंद असलेले कमळाचे फुल उमलले, त्यातून चमचमणारे लाईट लागले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. खासदार सातव यांच्या हा प्रकार जरा उशीराच लक्षात आला, पण तोवर वेळ निघून गेली होती.

औरंगाबाद : मेळावा वीज तांत्रिक कामगार संघटनेचा..... स्थळ हिंगोली येथील राष्ट्रवादी भवन....तर उद्घाटक हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव! असा अनोखा योग नुकताच जुळून आला होता. वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शंनसह विविध प्रश्‍नावर खल करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मेळाव्याचे उद्घाटन करण्यासाठी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी रिमोट कंट्रोलद्वारे दीपप्रज्वलन करण्याची शक्कल लढवली.

खासदार राजीव सातव व्यासपीठावर आले, हार-तुरे देऊन त्यांचे स्वागत झाल्यावर 'आता प्रमुख पाहुणे रिमोटचे कळ दाबून दिपप्रज्वलन करतील असे सूत्रसंचलन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले, तोवर सातव यांना काहीच कल्पना नव्हती. सातवांनी रिमोटची कळ दाबली आणि समोर ठेवण्यात आलेले बंद कमळ फुलले, त्यातील दिवे पेटले आणि मेळाव्याचे उद्गाटन झाले. हा प्रकार पाहून स्वतः सातव देखील अचंबित झाले.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रचंड लाटेतही मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे कायम राखले. अशोक चव्हाण आणि राजीव सातव या दोन काँग्रेसच्या नेत्यांनी मराठवाड्यात पक्षाची लाज राखली, असेही बोलले जाते. हिंगोली येथील काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. राहुल गांधी यांच्या आग्रहावरूनच सातव यांना हिंगोलीतून खासदारकीची उमेदवारी देण्यात आली होती. अर्थात विजय मिळवत सातव यांनी आपली निवड सार्थ ठरवली.

अशा राजीव सातव यांच्या संदर्भात हिंगोली नुकताच एक गमतीशीर प्रकार घडला. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या मेळाव्याला खासदार सातव यांनी उद्घाटक म्हणून हजेरी लावली. सातवांचे आगमन झाल्यानंतर आयोजकांनी त्यांच्या हातात एक रिमोटकंट्रोल आणून दिला आणि तो दाबून आपण मेळाव्याचे दीपप्रज्वलन करणार असल्याचे सांगितले. सातव यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवर उद्घाटनासाठी उभे राहिले, सातवांनी रिमोटची कळ दाबली आणि व्यासपाठासमारे ठेवलेले बंद असलेले कमळाचे फुल उमलले, त्यातून चमचमणारे लाईट लागले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. खासदार सातव यांच्या हा प्रकार जरा उशीराच लक्षात आला, पण तोवर वेळ निघून गेली होती.

त्यानंतर मात्र काँग्रेस खासदारांच्या हाताने भाजपचे कमळ फुलल्याची जोरदार चर्चा हिंगोली शहरात सुरु झाली. राज्यातील उर्जाखाते भाजपचे चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे आहे. कामगार संघटनेच्या मेळाव्याला कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव उद्घाटक म्हणून येणार असल्याने त्यांच्या सल्ल्यानेच तर हा 'रिमोट' उद्घाटनाचा घाट घालण्यात आला नाही ना? अशी कुजबूज मेळाव्यात सुरु होती. एकंदरीत खासदार सातव यांनी मात्र हा प्रकार 'लाईटली' घेतल्याचे समजते. संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी कुणाला डिवचण्याचा किंवा खोडसाळपणा करण्याचा आमचा हेतू नव्हता असे स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख