Aurangabad politics congress internal fight Sattar Vs Pawar | Sarkarnama

औरंगाबाद : "इंदू सरकार' विरोधातील आंदोलनात कॉंग्रेसचे पवार विरुध्द सत्तार 

जगदीश पानसरे : सरकारनामा ब्युुरो
बुधवार, 19 जुलै 2017

तारीख आधीच ठरली होती.. म्हणून

इंदू सरकार चित्रपटाविषयी आंदोलन करण्यासाठीची तारीख आधीच ठरली होती, त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होणे शक्‍य झाले
नसेल. शहर कॉंग्रेसने हा कार्यक्रम आयोजित केला होता. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार शहरात होते की नाही हे मला माहित नाही अशा शब्दांत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सरकारनामाकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

औरंगाबाद   :  शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडील प्रभारी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार पुन्हा आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपवल्यामुळे कॉंग्रेसमधील अतंर्गत विरोध उफाळून आला आहे.
 
"इंदू सरकार' या आणीबाणी विषयावरील चित्रपटाच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने क्रांतीचौकात करण्यात आलेल्या आंदोलनात पवार विरुध्द सत्तार चित्र पहायला
मिळाले. निदर्शनाचा कार्यक्रम शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार व त्यांच्या समर्थकांनी मात्र या आंदोलनकाडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे सत्तार शहरात असूनही आंदोलनाकडे फिरकले नाही.

अब्दुल सत्तार यांनी जिल्हाअध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे जिल्ह्याचाही  प्रभारी पदभार सोपवण्यात आला होता. परंतु तो केवळ नावालाच होता याची प्रचिती नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आली होती. त्यांनतर सत्ता स्थापनेसाठी झालेल्या शिवसेना-कॉंग्रेस युतीचे शिल्पकार देखील अब्दुल सत्तार हेच ठरले होते. सुरुवातीपासूनच सत्तार आणि नामदेव पवार याचे सुत फारसे जुळले नाही. नेहमीच एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या नेत्यांमधील दुरावा अधिकच वाढला आहे.

गेल्या आठवड्यात अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्षपदी पुन्हा आपली नियुक्ती झाल्याची घोषणा केली. यावेळी देखील शहराध्यक्ष नामदेव पवार
यांची अनुपस्थिती सर्वांना खटकली होती. यावरील प्रश्‍नावर सत्तार यांनी ते शहराचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे दुसरे नियोजन असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले होते.

गटबाजी चव्हाट्यावर

इंदू सरकार व त्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या विरोधात कॉंग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली आज क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या चित्रपटातून कॉंग्रेस व गांधी कुटुंबाची बदनामी
करण्यात आल्याचा आरोप करत कॉंग्रेसने राज्य आणि देशभरात रान पेटवले आहे. त्यानूसार औरंगाबादेत देखील कॉंग्रेसने आंदोलन केले. नामदेव पवार यांनी यासाठी पुढाकर घेतल्याने आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे व त्यांचे समर्थक या आंदोलनाकडे फिरकले नाहीत अशी जोरदार चर्चा कॉंग्रेसमध्येच सुरु आहे.

संबंधित लेख