Aurangabad Politics : BJP MLA Atul Save starts campaign well in advance | Sarkarnama

शिवसेना आणि एमआयएमच्या  आव्हानाचा सामना आमदार सावे शिबीरातुन करणार काय ?

जगदीश पानसरे : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार अतुल सावे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त 'अतुल्य'आरोग्य शिबीराचे आयोजन करत आगामी विधानभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम व इतर राजकीय पक्षांचे आव्हान पाहता आगामी विधानसभा निवडणूक भाजपला जड जाणार अशी चर्चा आहे.

औरंगाबाद : पुर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार अतुल सावे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त 'अतुल्य'आरोग्य शिबीराचे आयोजन करत आगामी विधानभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम व इतर राजकीय पक्षांचे आव्हान पाहता आगामी विधानसभा निवडणूक भाजपला जड जाणार अशी चर्चा आहे.

त्यामुळे केवळ आरोग्य शिबिरे भरवून आमदार सावे शिवसेना आणि एमआयएमचे आव्हानाचा सामना कसा करणार याबाबत उत्सुकता  आहे . या शिबिरांच्या माध्यमातून अतुल सावे विधानसभा निवणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत असे दिसते . 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे 4 हजार 260 मतांनी विजयी झाले होते. एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांचा त्यांनी पराभव केला होता. तर कॉंग्रेसचे राजेंद्र दर्डा व शिवसेनेच्या कला ओझा यांचे या निवडणुकीत डिपॉझीट जप्त झाले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा व तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत ऐनवेळी युती तोडत भाजपने शिवसेनेला झटका दिला होता. यावेळी मात्र शिवसेनेने निवडणुकीच्या दीडवर्ष आधीच विधानसभा व लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन भाजपने आपल्या पारंपारिक मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे.

आमदार अतुल सावे यांनी वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या 'अतुल्य आरोग्य' शिबीराकडे त्याच दृष्टीने बघितले जात आहे. साडेतीन वर्षाच्या काळात पुर्व मतदारसंघात अनेक विकास कामे केल्याचा दावा अतुल सावे यांच्याकडून केला जातो आहे. यात प्रामुख्याने मतदारसंघात 24 कोटींच्या सिमेंट रस्त्यांची कामे, भूमिगत गटार योजनांचा उल्लेख ते आर्वजून करतात.

अतुल्य आरोग्य शिबीराच्या आयोजनाचे यंदाचे दुसरे वर्ष. गेल्या वर्षी या शिबीराचा लाभ दहा हजार नागरिकांनी घेतल्याचे सांगितले जाते. 1187 मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, 2473 जणांना चष्म्यांचे वाटप आणि वीसहून अधिक मोठ्या शस्त्रक्रिया केल्याचा दावा आयोजकांकडून केला जातोय. यंदा ही संख्या दुप्पट व्हावी यासाठी अतुल सावे व त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत.

इच्छुकांची गर्दी, दिग्गजांची वापसी

पुर्व मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यमान आमदार अतुल सावे यांनाच भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. सध्या तरी त्यांच्या स्पर्धेत पक्षाकडून दुसरे कुठलेही नाव चर्चेत नाही. शिवसेनेने पुर्व मतदारसंघातून नगरसेवक राजू वैद्य यांना तयारीला लागा असे आदेश दिल्याचे कळते. तर राजेंद्र जंजाळ हे देखील पुर्व मधून इच्छुक असल्याने ऐनवेळी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पहावे लागेल.

एमआयएमने पुन्हा डॉ. गफ्फार कादरी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. 2014 मध्ये अवघ्या चार हजार मतांनी हुकलेला विजय यावेळी मिळवण्याचा प्रयत्न एमआयएम करणार आहे. तिकडे कॉंग्रेसच्या कार्यकर्ता शिबिराला साडेतीन वर्षांनी अचानकपणे हजेरी लावत माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांनी पुन्हा एकदा पुर्व मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

इच्छुकांची गर्दी आणि दिग्गजांची वापसी पाहता पुर्व मतदारसंघ राखण्यासाठी भाजपला जोर लावावा लागणार एवढे मात्र निश्‍चित. 2014 मध्ये मोदी लाटेमुळे मिळालेला विजय यावेळी भाजपला मिळतो का? की राज्य व केंद्रातील सरकारच्या विरोधात निर्माण झालेल्या वातावरणाचा फटका अतुल सावे यांना बसतो हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

संबंधित लेख