वैजापुरात 'बाबां'चा हात पुन्हा वाणींच्या पाठीशी?

वैजापुरात 'बाबां'चा हात पुन्हा वाणींच्या पाठीशी?

औरंगाबाद : जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी खासदार व ज्येष्ठ नेते रामकृष्णबाबा पाटील यांची भूमिका नेहमीच महत्वाची ठरली आहे. बांबाचा हात पाठीशी असल्यामुळेच शिवसेनेचे माजी आमदार आर.एम.वाणी तीनवेळा विधानसभेवर निवडूण जाऊ शकले. परंतु 2014 मध्ये मोदी लाट आणि बाबांची साथ असून देखील वाणी यांना राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून पुन्हा वाणी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तालुकाप्रमुख प्रा. रमेश बोरनारे हे देखील इच्छुक असले तरी वाणींच्या तुलनेत त्यांची ताकद अपुरी ठरण्याची शक्‍यता आहे.

वैजापूर मतदासंघावर 2014 चा अपवाद वगळता शिवसेनेचे पर्यायाने वाणींचे वर्चस्व राहीले. तीनवेळा विजयी झाल्यानंतर चौथ्यांदा वाणी यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. नेहमीप्रमाणे रामकृष्णबाबा पाटील यांनी वाणी यांना मदत केली, पण सामान्य शिवसैनिकांनाच वाणी पुन्हा आमदार म्हणून नको होते. याचा फटका सेनेला बसला आणि भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या रुपात राष्ट्रवादीने दिलेला फ्रेश चेहरा मतदारांना भावला. चिकटगावकर आमदार झाल्यानंतरची अडीच वर्ष सरली आहेत. पण या काळात नजरेत भरेल असे एकही काम मतदारसंघात झाले नसल्याची ओरड होतांना दिसते.

अगदीच त्यांची पाटी कोरी नाही. तालुक्‍यातील काही रस्त्यांची कामे, 33 के.व्ही.चे सबस्टेशन, फीडर बसवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. याशिवाय नांदुर मधमेश्‍वर कालव्यातून मध्यम प्रकल्पात पाणी आणण्याचे श्रेय देखील भाऊसाहेब पाटलांना जाते. पाणी कुणी आणले यावरून सध्या तालुक्‍यात राष्ट्रवादी विरुध्द भाजप असा वाद देखील सुरु आहे.

वाणींचा मार्ग सुकर?
रामकृष्णबाबा पाटील व आर.एम. वाणी हे समीकरण आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा जुळून आले तर वाणींच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो अशी चर्चा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाणी यांच्या मदतीनेच रामकृष्ण बाबांचे चिरंजीव काकासाहेब पाटील हे चेअरमन झाले. तर बांबांच्या सूनबाई वैशाली दादाराव पाटील या देखील लासूर सर्कलमधून शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आल्या आहेत. त्यामुळे रामकृष्णबाबा पाटील हे केवळ तनाने कॉंग्रेसमध्ये असल्याचे बोलले जाते. तालुक्‍यातील त्यांचा दबदबा आणि एकगठ्ठा मतांची ताकद वाणी यांना पुन्हा विधानसभेत पाठवू शकते अशी चर्चा आहे.

भाजपला मोदी लाटेची आशा
वैजापूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी यापुर्वी दोनदा निवडणूक लढवली. पण विजयाला गवसणी घालणे काही त्यांना जमले नाही. अगदी मोदी लाट देखील त्यांना गेल्या निवडणुकीत वाचवू शकली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाधव यांच्याकडे बघितले जात आहे. परंतु दोनवेळा पराभूत झालेल्या एकनाथ जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी की नव्या चेहऱ्यांला संधी द्यावी यावर भाजपमध्ये खल सुरु आहे. कॉंग्रेसचे बाळासाहेब संचेती यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. निवडणुकीच्या तोंडावर संचेती भाजपवासी झाले तर मग जिल्हाध्यक्ष जाधव आणि संचेती यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा होईल.

तालुक्‍यात भाजप विरोधात वातावरण असले तरी मोदीलाटेमुळे भाजपची नैय्या पार होईल असा विश्‍वास नेत्यांना आहे. कॉंग्रेसकडून आजच्या घडीला डॉ. दिनेश परदेशी यांचे एकमेव नाव उमेदवार म्हणून पुढे येत आहे. नगरपरिषदेतील सत्तेच्या माध्यमातून परदेशी यांनी शहरात चांगला जम बसवला आहे. पण ग्रामीण भागातून जोपर्यंत साथ मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेससाठी 'मुंबई अभी दुर है' असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com