Aurangabad municipal corporation politics China tour shivsena -BJP clash | Sarkarnama

मलाही चीनला येऊ द्या की हो...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 जुलै 2017

महापालिकेच्या सत्तेत मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेला
चीन दौऱ्यातून डावलल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. चीन दौऱ्याचे आमंत्रण फक्त भाजपलाच आहे का? असा सवाल करत आता चीन दौऱ्यालाच शिवसेनेने विरोध दर्शवला आहे.

औरंगाबाद:   12 जुलैला चीन दौऱ्यावर रवाना होणाऱ्या शिष्टमंडळात महापौर भगवान घडामोडे, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची नावे निश्‍चित आहेत. आता उर्वरित तीन जागांसाठी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता,विरोधीपक्षनेता, भाजपचे गटनेते यांच्या नावांची चर्चा आहे.

आता जागा तीन आणि इच्छुक सहा अशी परिस्थीती असतांना कुणाला न्यावे आणि कुणाला डावलावेअसा प्रश्‍न महापौर व आयुक्तांपुढे आहे. 

मलाही चीनला येऊ द्या की हो म्हणत पदाधिकाऱ्यांनी मात्र आपलीच वर्णी लागावी यासाठी फिल्डींग लावण्यास
सुरुवात केली आहे. डावलले जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेनेने चीन दौऱ्यालाच विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.

"महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात हा दौरा महापालिकेला परवडणारा आहे का? शहराची काळजी नसेल तर खुशाल चीन दौऱ्याला जा' असा जोरदार टोला सभागृहनेता गजानन मनगटे
यांनी लगावला आहे. सिक्कीम मधील सीमावादा वरुन भारत व चीनचे संबंध तणावपुर्ण आहेत याची आठवण करुन देतांनाच चीन दौऱ्याला जाऊ नये अशी विनंती
करण्यासाठी आपण महापौरांना फोन केला होता; पण त्यांनी फोन उचलला नाही असे मनगटे यांनी पत्रकारांना सांगितले.

 

" विकासाच्या नावाने शहरात बोंब आहे, वसुलीचा पत्ता नाही, पावसाळ्यामुळे शहरात आपत्कालीन स्थिती असतांना महापौर आणि आयुक्त चीनला जाऊन कोणता अभ्यास करणार आहे ",असा टोला शिवसेनेचे सभागृह नेते गजानन मनगटे यांनी लगावला आहे.

चीनमधील ड्युहॉंग हे शहर राज्यशासनाने "सिस्टर सिटी' म्हणून औरंगाबाद सोबत जोडले आहे. 14 ते 17 जुलै दरम्यान या शहरात ड्युहॉंग सिटी ब्रिक्‍स फ्रेंडशिप सिरीज ऍण्ड लोकल गव्हर्नमेंट फोरमतर्फे "इंटिग्रेटेड
डेव्हलपमेंट' या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी महापौर, आयुक्तांसह पाच जणांच्या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आलेआहे. या दौऱ्याचा खर्च देखील चीन सरकारकडूनच केला जाणार आहे.
महापालिकेच्या सत्तेत शिवसेना व बाजप बरोबरीचे वाटेकरी आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती या सगळ्याच पदासंदर्भात या दोन पक्षात करार झालले आहेत. परंतु शंभर कोटींचा निधी मिळाल्यापासून या दोन्ही
पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेला डावलण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपने चीन दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनला जाणाऱ्या
पाचजणांच्या दौऱ्यात शिवसेनेच्या एकाही सदस्याचा समावेश नसल्याची कुणकुण लागताच आज शिवसेनेच्या सभागृहनेत्यान उघड नाराजी व्यक्त केली आहे.

 

संबंधित लेख