Aurangabad Municipal corporation MIM politics :board in Urdu | Sarkarnama

 मराठी भाषा दिनाच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एमआयएमने लावला उर्दू बोर्ड

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

एमआयएमच्या बऱ्याच नगरसेवकांना मराठी भाषेत निघणारी विषयपत्रिका वाचता येत नाही. त्यामुळे स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका उर्दू भाषेतून देण्याची मागणी देखील एमआयएमच्या नगरसेवकांनी लावून धरली आहे. मात्र सत्ताधारी व प्रशासनाकडून ही मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही . 

औरंगाबाद :  मंगळवारी राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा होत नाही तोच एमआयएमने भाषेचे राजकारण करत महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उर्दू मधून फलक लावत वेगळ्याच वादाला वाचा फोडली आहे.

फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच एमआयएमचे गोंधळी नगरसेवक सय्यद मतीन यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर उर्दू भाषेत पालिकेच्या नावाचा फलक लावण्याची मागणी केली होती. आपल्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी स्वतः बुधवारी (ता.28) प्रवेशद्वारावर उर्दू भाषेत लिहलेला फलक लावला.

महापालिकेकडून गरीबांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, त्यासाठीची अर्जप्रक्रिया मराठीतून असल्याने मुस्लीम समाजाला अडचणींचा सामना करावा लागतो असा दावा एमआयएमने केला. तसेच पालिकेचे मुख्य प्रवेशद्वार आणि इमारत टप्प्या क्रमांक-3 मध्येही महापालिकेचे नाव उर्दू भाषेत लिहिण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक मतीन यांनी 7 फेब्रुवारी रोजी महापौर व पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.

त्यासाठी मालेगाव आणि नांदेड पालिकेचा मुख्य प्रवेशद्वारावर उर्दू भाषेचे फलक लावण्याचा दाखलाही त्यांनी दिला होता. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरही उर्दू भाषेत माहिती फलक लावले असल्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाकडून यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत बुधवारी मतीन यांनी स्वतःच पालिकेच्या नावाचा उर्दू फलक प्रवेशद्वारावर लावला.

 

संबंधित लेख