शंभर कोटीच्या श्रेयासाठी भाजपचा हट्ट, शिवसेनेचा सभात्याग

शंभर कोटीच्या श्रेयासाठी भाजपचा हट्ट, शिवसेनेचा सभात्याग

औरंगाबाद : शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आणण्याचे श्रेय आमचेच, त्यामुळे सत्कार व अभिनंदन फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा होणार 
असा हट्ट भाजपने धरला. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेतून त्याग करत भाजपाचा निषेध केला. मनपा आयुक्त उपस्थित नसल्याने पुर्वी तहकुब करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (ता.7) दुपारी घेण्यात आली. निधी आणल्याचे श्रेय, स्व. बाळासाहेब ठाकरे 
यांच्या स्मारकाला एमआयएमने दर्शवलेला विरोध, चीन दौरा आणि महापौरांनी गुलदस्त्यात ठेवलेली रस्त्यांची यादी यावरून सर्वसाधारण सभा वादळी होणार 
याचा अंदाज सुरुवातीलाच आला होता. 

सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी शहराला शंभर कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, महापौरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यापाठोपाठ माजी उपमहापौर आणि भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी देखील राजू शिंदेची री ओढत निधीचे सर्व श्रेय हे भाजप आणि महापौर भगवान घडामोडेंचेच आहे, त्यामुळे ज्या नगरसेवकांना आपल्या वार्डातील रस्त्याची कामे करून घ्यायची असतील त्या सगळ्यांनी सत्काराला चला असे आवाहन केले. 

अभिनंदन सगळ्यांचेच करा 
श्रेय लाटण्यासाठी भाजप हट्टाला पेटल्याची पाहून शिवसेनेचे नगरसेवकही आक्रमक झाले. नंदकुमार घोडेले यांनी अभिनंदनाच्या ठरावाला आक्षेप घेत पालकमंत्री रामदास कदम यांनी रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता याची आठवण करून दिली. त्यामुळे निधा आणल्याचे श्रेय एकट्या भाजपने घेऊन स्वःताची पाठ थोपटून घेऊ नये, अभिनंदनच करायचे असेल तर शिवसेनेसह सगळ्यांचेच करा असा आग्रह शिवसेनेने धरला. पण भाजप नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याशिवाय नागरी सत्कार स्वीकारणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा महापौर घडामोडे यांनी घेतली होती. आता शंभर कोटींचा निधी राज्य 
सरकारने दिला आहे, शहर खड्डेमुक्त होणार आहे, तेव्हा महापौरांनी सत्कार स्वीकारावा असे म्हणत भाजपच्या नगरसेवकांनी डायसकडे धाव घेतली. भाजपच्या हेकेखारेपणाचा निषेध करत शिवसेनेचे सर्व नगरसेवक सभात्याग करत बाहेर पडले. 

शिवसेनेपाठोपाठ एमआयएमचाही सभात्याग 
शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी भाजपला धारेवर धरले. शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील कोणते रस्ते करणार याची यादी सभागृहात जाहीर करा अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी लावून धरली. चीन आणि भारत यांच्या सीमावादावरून तणाव निर्माण झालेला आहे, चीनकडून सातत्याने युध्दाची धमकी दिली जातेय. या पार्श्‍वभूमीवर चीनचा दौरा रद्द करण्याची मागणी एमआयएमने लावून धरली. या विरोधाकडे देखील महापौर व भाजपच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. तेव्हा संतापलेल्या एमआयएम नगरसेवक अब्दुल नाईकवाडे यांनी महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एमआयएमने देखील भाजपचा निषेध करत सभात्याग केला आणि महापालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर चीनचा झेंडा जाळला. 

महापौरांचा फोन 
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला सभात्याग करावा लागल्याने त्याचा चुकीचा संदेश शहरवासियांमध्ये जाऊ शकतो याची जाणीव महापौर घडामोडे 
यांना झाली. शिवसेनेचे सभागृहनेते गजानन मनगटे यांना महापौरांनी फोन करुन सभागृहात येऊन कामकाजात सहभागी होण्याची विनंती केला पण शिवसेनेने ती 
धुडकावून लावली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com