aurangabad mayor | Sarkarnama

जनसंपर्कांवरून खैरेंनी महापौरांना सुनावले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले हे खासदार चंद्रकांत खैरे यांचे पट्टशिष्य असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र, याच शिष्याला मंगळवारी (ता.27) गुरूने चांगलेच चिमटे काढले. शहरातील विकासकामे करण्याचे सोडून इथे, तिथे कार्यक्रमांना हजेरी लावून जनसंपर्क कशासाठी वाढवत आहात ? महापौरांना आमदार, खासदार व्हायचंय का, असा टोलाही खैरेंनी त्यांना लगावला. 

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले हे खासदार चंद्रकांत खैरे यांचे पट्टशिष्य असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र, याच शिष्याला मंगळवारी (ता.27) गुरूने चांगलेच चिमटे काढले. शहरातील विकासकामे करण्याचे सोडून इथे, तिथे कार्यक्रमांना हजेरी लावून जनसंपर्क कशासाठी वाढवत आहात ? महापौरांना आमदार, खासदार व्हायचंय का, असा टोलाही खैरेंनी त्यांना लगावला. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) खासदार खैरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेत सामान्य व्यक्‍तींनी, लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्‍न, आरोप, तक्रारींना उत्तरे देण्यात आली. यावेळी भारत पेट्रोलियमच्या प्रतिनिधी उज्ज्वला गॅसच्या लाभार्थ्यांबाबत माहिती देत असतानाच महापौर घोडेले यांनी याची माहिती आम्हालाही थोडी फार द्यायला हवी, तशी आम्ही ती मागतही होतो, पण तुम्ही दिलीच नाही असे म्हटले. त्यावर लगेच खासदार खैरेंनी ते केंद्रांशी संबंधित असते, तुम्हाला त्याची गरज नाही असे महापौरांना सुनावले. यावरून दोघांमध्ये काही तरी बिनसले अशी कुजबुज सुरू झाली. 

बैठक संपल्यानंतर खासदार खैरेंशी पत्रकारांनी संवाद साधला. शहरातील अतिक्रमणांसह अन्य विषयांवर छेडले असता ते म्हणाले, की होय, रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी, अतिक्रमणाचे प्रश्‍न सुटायलाच हवेत. ही कामे महापौरांनी करावी. मात्र, ते रुबेला व इतर उपक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांना जनसंपर्क वाढवायचा आहे का? आणि हे करून आमदार, खासदार व्हायचंय का? असा सवालही केला. 
जय श्रीरामचा नारा.. अन्‌ गैरहजेरीवरून चढला पारा 
रस्ते सुरक्षेवरून चर्चा रंगल्यानंतर समारोपाच्या वेळी खासदार खैरेंनी कुणालाही अपघात होऊ नये, अशी जय श्रीराम चरणी प्रार्थना करतो, असे म्हटले. अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाऐवजी जय श्रीरामचा नारा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांबद्दल त्यांनी संताप व्यक्‍त केला. गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिल्या.

संबंधित लेख