aurangabad mayor | Sarkarnama

महापौर घोडेले यांचे वर्ष पूर्ण, पण शहरातील कचऱ्याची समस्या कायमच ...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या महापौरपदाची आज वर्षपूर्ती झाली. या निमित्ताने त्यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन आपल्या कार्यकाळातील कामकाजांचा लेखाजोखा मांडला. पण तो मांडत असतांना वर्षभरातील कामकाजाबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसण्यापेक्षा कचराकोंडीच्या डागाचा तणावच अधिक होता. प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतरही प्रशासन आणि पक्षांतर्गत विरोधकांमुळे घोडेले यांच्या प्रगती पुस्तकावर लाल शेराच अधिक दिसतो. 

औरंगाबाद : शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या महापौरपदाची आज वर्षपूर्ती झाली. या निमित्ताने त्यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन आपल्या कार्यकाळातील कामकाजांचा लेखाजोखा मांडला. पण तो मांडत असतांना वर्षभरातील कामकाजाबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसण्यापेक्षा कचराकोंडीच्या डागाचा तणावच अधिक होता. प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतरही प्रशासन आणि पक्षांतर्गत विरोधकांमुळे घोडेले यांच्या प्रगती पुस्तकावर लाल शेराच अधिक दिसतो. 

भाजपचे तत्कालीन महापौर बापू घडामोडे यांचा कार्यकाळ संपला आणि त्यांनी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांच्याकडे पदभार सोपवला. तो सोपवत असतांनाच कचराकोंडीचे गिफ्टही दिले. अडीच वर्ष महापौरपद शिवसेनेकडे असल्यामुळे घोडेले यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावून मातोश्रीवरून आपल्या नावाला हिरवा कंदील मिळवला. पण तेव्हा भविष्यात त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना त्यांना नव्हती. 

शहराचा आता कायपालट करून टाकतो अशा राणा भीमदेवी थाटात घोडेले महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. पण तोपर्यंत शहरातील कचराकोंडीने उग्ररुप धारण केले होते. नारेगांववासियांचा टोकाचा विरोध, लोकप्रतिनिधींचा आपापल्या भागात कचरा आणून टाकण्यास केलेला विरोध, पडेगांवात कचरा प्रश्‍नावरून उसळलेली दंगल, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना शहवासियांची मागावी लागलेली माफी या सगळ्या घटना घोडेले यांच्यासाठी अपशकुनच ठरल्या. 

समांतर, रस्ते आणि कचरा... 
शहरातील कचरा प्रश्‍न सोडवण्यासाठी घोडेलेंनी अगदी पहाटे शहरात फिरून साफसफाईवर लक्ष केंद्रीत केले. पण त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरले. रोज निर्माण होणारा कचरा कुणीच आपल्या भागात येऊ देईना त्यामुळे, कचरा उचलला तर जात होता, पण तो टाकायचा कुठे हा मोठा प्रश्‍न होता. भाजपने यात सोयीस्कर राजकारण करत शिवसेनेची होईल तेवढी बदनामी केल्याची देखील चर्चा होती. 

कचऱ्याचा प्रश्‍न आठ महिन्यानंतरही सुटलेला नाही, यावर मलमपट्टी करण्याचे कामच अधिक झाले. त्यामुळे आजही लोकांना नाक-तोंड दाबूनच शहरातून फिरावे लागते ही वस्तुस्थिती आहे. या शिवाय समांतर योजनेचे पुनरुज्जीवन, शंभर कोटींच्या रस्त्याच्या कंत्राट प्रकरणात देखील महापौरांचे "स्वारस्य' वेळोवेळी दिसून आले. महापालिकेत दलालांचा अधिक वावर असल्याचा बॉम्बगोळा टाकत आयुक्त निपूण विनायक यांनी देखील एकप्रकारे महापालिकेतील कारभाराचे वाभाडेच काढले होते. कचरा प्रश्‍न सोडवण्यात तज्ञ म्हणून निपूण यांची खास दिल्लीहून औरंगाबादेत नियुक्ती करण्यात आली होती. पण सत्ताधारी, दलाल आणि प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांपुढे त्यांनी देखील हात टेकले. 

एकंदरित महापौरांचा एक वर्षाचा कार्यकाळ रखडलेली विकास कामे, जैसे थे कचऱ्याचा प्रश्‍न वर्षभरापुर्वी शंभर कोटींचा निधी मिळाल्यानंतरही रस्त्यांच्या कामाला न झालेली सुरूवात आदी प्रश्‍नामुळेच चर्चिला गेला. आपल्या वर्षपुर्तीचे प्रगती पुस्तक सादर करतांना महापौरांनी आतापर्यंत शहरातील एक लाख मेट्रीक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केल्याचा दावा केला. यावर महापालिकेतील अधिकाऱ्यांनीच तोंडात बोटे घातली. एवढेच नाही तर महिनाभरातच शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सुटेल अशी नवी डेडलाईन देखील घोडेले यांनी दिली. यावरून नेमकी शहरातील कचऱ्याची स्थिती काय आहे याचा अंदाज येतो. 
 

संबंधित लेख