औरंगाबाद महापालिकेत युतीचा स्वंतत्र कारभार :भाजपचा महापौर होताच रस्त्यांसाठी दीडशे कोटी मिळाले

शहरातील रस्त्यांची यादी घेऊन महापौर घडामोडे, भाजपचे पुर्वमधील आमदार अतुल सावे व इतर पदाधिकारी मंगळवारी मुंबईत गेले होते. अर्थमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देताच 150 कोटींचा निधी दोन टप्यात देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
BJP-SYOMBOL-2.jpg
BJP-SYOMBOL-2.jpg

औरंगाबाद :  शिवसेना-भाजप यांच्यातील राज्यस्तरीय तणावाचा परिणाम महापालिकेतील कारभारावर होतांना दिसतो आहे. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी सरकारकडे 150 कोटींचा निधी महापालिकेने मागितला होता. पण शिवसेनेचा महापौर असतांना निधी आणि रस्त्यांची कामे झाली तर त्याचे श्रेय देखील सेनेला जाईल या भितीने भाजपने चालाखी करत महापौरपद भाजपकडे येण्याचा वाट पाहिली. भगवान घडामोडे महापौरपदी विराजमान होताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्त्यांचा प्रस्ताव मागून घेतला आणि 150 कोटींच्या निधीला तात्काळ मंजुरी देखील दिली.

भाजपचा महापौर बसताच अवघ्या तीन महिन्यातच निधी मंजुर झाल्यामुळे महापालिकेत सत्ता युतीची असली तरी कारभार मात्र स्वतंत्रपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे.

शहराला खड्डेमुक्त केल्याशिवाय नागरी सत्कार स्वीकारणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा भाजपचे महापौर भगवान घडामोडे यांनी पदभार स्वीकारतांना केली होती. त्यांच्या या निर्णयाचे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी समर्थन केले होते. शिवाय केवळ शपथ घेऊन थांबू नका तर निधीसाठी सरकारकडे पाठपुरावाही करा अशा सूचना देखील दिल्या होत्या.

राज्याच्या सरकारमध्ये वाटेकरी असून देखील भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याने अनेकदा भाजपची गोची होते. तोच कित्ता आता शिवसेना मोठा भाऊ असले त्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत गिरवण्याचे भाजपने ठरवल्याचे दिसते. याचे ताजे उदाहरण म्हणून या निधी मंजुरीकडे पाहता येईल.

विशेष म्हणजे या निधीसाठी सुरुवातीपासूनत भाजपने स्वतंत्रपणे पाठपुरावा केला होता. शिवसेनेला डावलून निधा मिळवायचा आणि त्याचे श्रेय लाटायचे हा उद्देश सफल होतांना दिसतो आहे. शहरातील रस्त्यांची यादी घेऊन महापौर घडामोडे, भाजपचे पुर्वमधील आमदार अतुल सावे व इतर पदाधिकारी मंगळवारी मुंबईत गेले होते. अर्थमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देताच 150 कोटींचा निधी दोन टप्यात देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. 

शिवसेना बॅकफूटवर
युतीमध्ये झालेल्या करारानूसार भाजपकडे एक वर्षासाठी महापौरपद आले आहे. त्यांनतर पुन्हा शिवसेनेचा महापौर होईल. ऐतिहासिक जगप्रसिध्द अजिंठा-वेरूळ लेण्या व महाराष्ट्राची पर्यनट राजधानी म्हणून औरंगाबाद शहर जगभरात ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षात खड्यांचे शहर म्हणून औरंगाबादची कुप्रसिध्दी झाली. शिवसेनेचा महापौर असतांना पालकमंत्री रामदास कदम यांनी डीपीडीसीतून शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी दिला होता.

आता भाजपचा महापौर असल्याने मुख्यमंत्र्यांनी हात सैल करत 150 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातून खरेच शहर खड्डेमुक्त होते की शहरवासियांच्या नशिबी पुन्हा तेच धक्के येतात हे लवकरच स्पष्ट होईल. शिवसेना-भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे मात्र शहर खड्डयात गेल्याचे चित्र आहे. पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी औरगाबादेतील रस्त्यांची कामे पारदर्शकपणे करण्यासाठी विशेष समिती घोषित केली आहे. भाजपने शहर खड्डेमुक्त करुन दाखवले तर या जोरावर 2019 मध्ये महापालिकेत बहुमतासह भाजपचा महापौर बसवण्याची खेळी केली जाऊ शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com