Aurangabad district congress had to wind hunger strike to facilitate Sattar's foreign tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

अब्दुल सत्तार यांच्या विदेश दौऱ्यासाठी कॉंग्रेसने आंदोलन गुंडाळले !

जगदीश पानसरे
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

31 तारखेच्या संध्याकाळी अब्दुल सत्तार यांनी उपोषण मागे घेत मतदारसंघ गाठला. उपोषणामुळे अशक्तपणामुळे ते आता आराम करतील असा सगळ्यांचा अंदाज होता. पण ठणठणीत झालेल्या सत्तार यांनी दुसऱ्याच दिवशी (ता.1) सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने  जंगी कार्यक्रम घेतला.

औरंगाबादः कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांना विदेश दौऱ्यावर जायचे असल्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले उपोषण कॉंग्रेसने गुंडाळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधीमंडळातील लोक लेखा समितीचा दौरा चार ते 13 सप्टेंबर दरम्यान, लंडन, नेदरलॅंन्ड आणि फ्रान्समध्ये जाणार आहे. अब्दुल सत्तार यांची या दौऱ्यासाठी निवड झाली असून रविवारी (ता.2) सत्तार मुंबईला रवाना झाले आहेत. 

मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने 2 ऑगस्टपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले होते. आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेले चक्री उपोषण कालांतराने विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात आले. 

कॉंग्रेसने आंदोलन मागे घ्यावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी देखील सरकारच्या वतीने आंदोलकांची भेट घेऊन विनंती केली होती. मात्र आरक्षणा संदर्भात जोपर्यंत लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेवर कॉंग्रेस ठाम होती. 2 ते 29 ऑगस्टपर्यंत सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली नाही असा आरोप करत अब्दुल सत्तार यांनी चक्री उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात केले. 

दुसऱ्या दिवशी उपोषणस्थळी अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मुख्यमंत्र्यांकडून लेखी मिळाल्याशिवाय हटणार नाही हा बाणा कायम ठेवला. तिसऱ्या दिवशी दुपारी अचानक आमदार सत्तार, सुभाष झाबंड यांच्यासह उपोषणाला बसलेल्या बहुतांश आंदोलकांची प्रकृती बिघडली. 

आंदोलकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्‍टरांचे पथक उपोषणस्थळी आले. आंदोलकांना रुग्णालयात भरती होऊन उपाचर घेण्याचा सल्ला डॉक्‍टारांनी दिला. पण सत्तार लेखी आश्‍वासनावर ठाम होते. त्यामुळे उपोषणस्थळीच सत्तार यांच्यासह आंदोलकांना सलाईन लावण्यात आले. 

दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून परिस्थीती सांगितली. त्यांनतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे लेखी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. ते घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार सत्तार यांची भेट घेतली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे ही तातडीने उपोषणस्थळी दाखल झाले आणि त्यांनी सत्तार यांच्यासह आंदोलकांना शरबत पाजत उपोषण सोडवले. 

सत्तार ठणठणीत, कार्यक्रमांचा सपाटा 

31 तारखेच्या संध्याकाळी अब्दुल सत्तार यांनी उपोषण मागे घेत मतदारसंघ गाठला. उपोषणामुळे अशक्तपणामुळे ते आता आराम करतील असा सगळ्यांचा अंदाज होता. पण ठणठणीत झालेल्या सत्तार यांनी दुसऱ्याच दिवशी (ता.1) सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटपाचा जंगी कार्यक्रम घेतला. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थिीत मंजुरी पत्राचे वाटप केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणेच रविवारी (ता.2) रोजी सायंकाळी अब्दुल सत्तार विमानाने मुंबईला रवाना झाले. 

कॉंग्रेसच्या चक्री उपोषणाचे आमरण उपोषणात रुपांतर झाल्यानंतर ज्या वेगाने घडामोडी घडल्या त्यावरून आता वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. 4 ते 13 सप्टेंबर दरम्यान विदेश दौऱ्यावर जायचे असल्यामुळेच कॉंग्रेसने आंदोलन गुंडाळल्याची चर्चा आता विरोधकांकडून सुरू झाली आहे. 

असा होता घटनाक्रम 

2 ऑगस्ट- औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे चक्री उपोषण. 

25 ऑगस्ट- विधानसभा मतदारसंघ निहाय जिल्हाभरात चक्री उपोषण 

29 ऑगस्ट- चक्री उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात. सत्तार यांच्यासह 74 कार्यकर्त्यांचा सहभाग 

30 ऑगस्ट- अब्दुुल सत्तार यांची पत्रकार परिषद. लेखी आश्‍वासना शिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्णय 

31 ऑगस्ट- आंदोलकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात जाण्यास नकार, उपोषणस्थळी सलाईन लावले 

31 ऑगस्ट- सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवांचे पत्र घेऊन जिल्हाधिकारी उपोषणस्थळी 

31 ऑगस्ट- सायंकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण मागे 

1 सप्टेंबर - सिल्लोड नगर परिषदेच्या पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप कार्यक्रमात सत्तार यांचा सहभाग. 

2 सप्टेंबर- सायंकाळी चिकलाठाणा विमानतळावरून मुंबईसाठी रवाना. 

4 सप्टेंबर ते 13 पर्यंत लंडन, नेदरलॅन्ड, फ्रान्स विदेश दौऱ्यावर अब्दुल सत्तार रवाना होणार. 
 

संबंधित लेख