औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या संचालकांविरुद्ध बेकायदेशीर कर्जमाफी प्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या संचालकांविरुद्ध बेकायदेशीर कर्जमाफी प्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत सहकारी संस्थांना दिलेले साडेआठ कोटींचे कर्ज बेकायदेशीरपणे माफ केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक मंडळातील आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, माजी आमदार नितीन पाटील, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, लेखा परीक्षण करणाऱ्या खासगी संस्थेसह कर्जमाफी देण्यात आलेल्या 52 संस्थांच्या अध्यक्षांचा देखील यात समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने वर्ष 2000 मध्ये जिल्ह्यातील 52 सहकारी संस्थांना साडेआठ कोटींचे कर्ज वाटप केले होते. बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य व त्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या संस्थांना हे कर्ज देण्यात आले होते. परंतु अनेक वर्ष उलटून गेल्यावरही या संस्थांनी कर्जाची परतफेड केली नव्हती. 

2013 मध्ये औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असलेल्या सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने 52 सहकारी संस्थांकडे थकीत असलेले 8 कोटी 52 लाख 1 हजार 862 रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. सहकार कायद्याच्या नियमानुसार थकीत कर्जाच्या वसुलीसाठी करावी लागणारी कुठलीच कायदेशीर प्रक्रिया न करता परस्पर कर्जमाफी देण्याचा निर्णय त्यावेळच्या संचालक मंडळाने घेतला होता. 

या प्रकरणी ऍड. सदाशिव गायके यांच्या मार्फत डिसेंबर 2015 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर संचालक मंडळाला पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी नाबार्ड, सहकार विभागांना पत्र दिले होते. 

आर्थिक शाखेच्या प्राथमिक तपासातून या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऍड. सदाशिव गायके यांच्या फिर्यादीवरून 2013 मध्ये कार्यरत असलेल्या संचालक मंडळा विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बावीसजणाविरुद्ध गुन्हा दाखल 
बनावट व खोटी कागदपत्र तयार करून वसुली न करता 52 संस्थांचे कर्ज माफ करत सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी खालील संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले आहेत. 
1) सुरेश दयाराम पाटील 2) जयराम नाथुजी साळुंके 3) नितीन सुरेश पाटील 4) बाबूराव रामदास पवार 5) शब्बीर खॉं हुसैन खॉं पटेल 6) शेख अब्दुल सत्तार शे. अब्दुल नबी 7) लक्ष्मीनारायण मोहनलाल जैस्वाल 8) संदीपान आसाराम भुमरे 9) दशरथ शंकर गायकवाड 10)त्र्यंबक रामनाथ मदगे 11) शिवाजी भीमराव गाडेकर 12) विष्णू रंगनाथ जाधव 13) नानाराव विठ्ठल कळंब 14) दत्तू संपत चव्हाण 15) श्रीराम तुकाराम चौधरी 16)ऍड. शांतिलाल छापरवाल 17) अशोक पुंडलिक पाटील 18) किरण अशोक पाटील 19) भरतसिंग देवसिंग छानवाल 20) एस.पी. शेळके 21) राजेश्‍वर भीमराव कल्याणकर 22) चंद्रकांत भोलाने (सीए) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com