औरंगाबादमध्ये काँग्रेसला उमेदवार सापडेनात; विधानसभा इच्छुकांना अर्ज घेऊन जाण्याचे जाहीर आवाहन 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसची मोठी नाचक्की झाली. वंचित बहुजन आघाडीमुळे दलित-मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचा फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केवळ जिल्ह्यातच नाही, तर संपुर्ण राज्यात बसला. औरंगाबादेत लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्यावर डिपॉझीट गमावण्याची नामुष्की ओढावली. या दारूण पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढण्यास फारसे कुणी इच्छुक नसल्याचे चित्र आहे.
औरंगाबादमध्ये काँग्रेसला उमेदवार सापडेनात; विधानसभा इच्छुकांना अर्ज घेऊन जाण्याचे जाहीर आवाहन 

औरंगाबाद : सत्तर वर्ष देशावर अधिराज्य गाजवणाऱ्या कॉंग्रसे पक्षाची सध्या राज्यात वाईट अवस्था आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रसेला मात्र उमेदवार सापडत नाहीयेत अशी स्थिती आहे. औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीने तर विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्यांनी अर्ज घेऊन जावे, असे जाहीर आवाहनच केले आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसची मोठी नाचक्की झाली. वंचित बहुजन आघाडीमुळे दलित-मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचा फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केवळ जिल्ह्यातच नाही, तर संपुर्ण राज्यात  बसला. औरंगाबादेत लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्यावर डिपॉझीट गमावण्याची नामुष्की ओढावली. या दारूण पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढण्यास फारसे कुणी इच्छुक नसल्याचे चित्र आहे. 

सुभाष झांबड यांच्या सारखा आर्थिक ताकद असलेला उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवून देखील कॉंग्रेस चौथ्या क्रमाकावर फेकली गेली. त्यामुळे लोकसभा निवडणुकी आधी आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांच्या आता पाचावर धारण बसली आहे. मुंबईत झालेल्या प्रदेश कॉंग्रेस कमिटीत औरंगाबादेत झालेल्या पराभवाचे चिंतन केल्यानंतर पक्षविरोधात काम करणाऱ्यांची गच्छंती करण्याचा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. 

इच्छुकांचा सावध पावित्रा
लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहण्याची शक्‍यता लक्षात घेऊन अनेक कॉंग्रेस इच्छुकांनी आपल्या मनाला आवर घातल्याचे बोलले जाते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसला मिळालेली मते पाहता इथून कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येणे कठीण दिसते. नेमका याचाच धसका इच्छुकांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या साडेअकरा लाख मतांपैकी कॉंग्रेसच्या वाट्याला केवळ 91 हजार मते आली. सुभाष झाबंड यांनी साम, दाम, दंड भेद नितीचा अवलंब केल्यानंतरही कॉंग्रेसला डिपॉझीट देखील राखता आले नाही. झाबंड यांना कन्नड-11285, गंगापूर-12781, वैजापूर-23870, औरंगाबाद मध्य-14155, पश्‍चिम-15595 तर पुर्व विधानसभा मतदारसंघात 14096 एवढी मते मिळाली होती. ही आकडेवारी पाहता कॉंग्रेसला जिल्ह्यात खातेही उघडता येईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. 

एरव्ही विधानसभा निवडणुक म्हटलं की एका मतदारसंघासाठी दहा ते पंधरा इच्छुक उभे राहतात. अशावेळी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी असा प्रश्‍न वरिष्ठ नेत्यांना पडतो. कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षात हे चित्र आतापर्यंत पहायला मिळाले. परंतु लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेस पक्षाला आहोटी लागली आहे. त्याचे अनेक मोठे नेते पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात जात आहे. अशावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते बिथरले नाहीतर नवलच. 

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडे जिल्ह्यात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्यांनी अर्ज घेऊन जावेत असे आवाहन जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केले आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघासाठीचे अर्ज शहराध्यक्ष नामदेव पवार, तर ग्रामीण भागातील तीन विधानसभा मतदारसंघातील अर्ज प्रभारी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com