Aurangabad Congress Agitation | Sarkarnama

काँग्रेसच्या चक्री उपोषणात नेत्यांना बसण्यासाठी नवेकोरे लोड

  सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

चक्री उपोषणासाठी नेहमीच्या ठिकाणी मांडव आणि त्यात सतरंज्या टाकण्यात आल्या होत्या. सरकार विरोधी घोषणाबाजी आणि फोटोसेशन झाल्यानंतर नेते सतरंजीवर बसण्यासाठी गेले. पण टेकूसाठी कुठालच आधार नसल्याने थोड्याच वेळात नेत्यांच्या पाठीला कळ लागली. दिवसभर असे बसणे शक्‍य नाही असे लक्षात येताच नेत्यांसाठी लोडची व्यस्था करण्याचे फर्मान सोडण्यात आले. 

औरंगाबाद : मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज (ता.2) जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण करण्यात आले. वर्षानुवर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलनाची व जमीनीवर बसण्याची फारशी सवय न राहिल्यामुळे उपोषणस्थळी त्यांची चांगलीच पंचाईत झाली. टेकू असल्याशिवाय बसता येत नसल्याने अखेर काँग्रेसच्या नेत्यांसाठी नवेकोरे लोड आणण्यात आले. त्यावर बसल्यानंतरच चक्री उपोषणाला सुरूवात झाली. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने राज्यभरात पेट घेतला आहे. आत्महत्या, हिंसक आंदोलन, जेलभरो,आमदारांचे राजीनामे आणि लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या देत आंदोलकांनी आंदोलनाची धग कायम ठेवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर व दोन दिवसांपुर्वी काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. 

त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगले जोशात आहेत. मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी अकरा वाजेपासून चक्री उपोषण सुरू केले. आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे, सेवादलाचे विलास औताडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 

चक्री उपोषणासाठी नेहमीच्या ठिकाणी मांडव आणि त्यात सतरंज्या टाकण्यात आल्या होत्या. सरकार विरोधी घोषणाबाजी आणि फोटोसेशन झाल्यानंतर नेते सतरंजीवर बसण्यासाठी गेले. पण टेकूसाठी कुठालच आधार नसल्याने थोड्याच वेळात नेत्यांच्या पाठीला कळ लागली. दिवसभर असे बसणे शक्‍य नाही असे लक्षात येताच नेत्यांसाठी लोडची व्यस्था करण्याचे फर्मान सोडण्यात आले. 

ऐनवेळी लोडची व्यवस्था कशी करावी या पेचात पडलेल्या कार्यकर्त्याला मग एका नेत्याने 'अरे नवे घेऊन या' असे आदेश दिले आणि काही मिनिटांत नवेकोरे लोड नेत्यांच्या दिमतीला हजर झाले. मग त्यावर बसत नेत्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आणि उपोषणाचे चक्र सुरू झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पंधरा दिवसांपासून शहरात आंदोलन सुरू आहे. काँग्रेसने मात्र आजपासून चक्री उपोषण सुरू केल्याने 'काँग्रेसला उशीराने जाग आली का' अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

संबंधित लेख