Aurangabad congress | Sarkarnama

आरक्षणासाठी कॉंग्रेसचे आता जिल्हाभरात चक्री उपोषण

सरकारनामा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

चक्री उपोषणाचे हे लोण आता केवळ शहरापुरतेच मर्यादित न ठेवता हे आंदोलन संपुर्ण जिल्ह्यात पोचवण्याचा निर्णय जिल्हा कॉंग्रेस कमिटीने घेतला आहे. 

औरंगाबादः मराठा, मुस्लिम, धनगर व कोळी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. बावीस दिवसांनतर या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानूसार आता हे चक्री उपोषण जिल्हाभरात विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात येणार आहे. जोपर्यंत आरक्षणाचा कायदा होऊन ते लागू होत नाही तोपर्यंत चक्री उपोषण सुरू ठेवण्याच निर्धार कॉंग्रेसने केला आहे. 

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा सचिवांकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर बावीस दिवसांपुर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात आले. चक्री उपोषणाचे हे लोण आता केवळ शहरापुरतेच मर्यादित न ठेवता हे आंदोलन संपुर्ण जिल्ह्यात पोचवण्याचा निर्णय जिल्हा कॉंग्रेस कमिटीने घेतला आहे. 

त्यानूसार शुक्रवारी (ता. 24) शहरातील पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने चक्री उपोषण करण्यात आले. शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रदेश प्रतिनिधी जितेंद्र देहाडे यांच्यासह मतदारसंघातील कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

विधानसभेत जोपर्यंत आरक्षणा संदर्भातील कायदा होऊन त्याची अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात चक्री उपोषण सुरूच ठेवण्याचा संकल्प जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 
 

संबंधित लेख