महापालिका आयुक्त निपूण विनायक यांचा ट्विटरद्वारे समस्या सोडवण्यावर भर 

प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपध्दती नेहमीच सामान्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. कुणाला दालनात गर्दी आवडते, तर कुणाला वर्दळ नकोसी वाटते. काही अधिकारी सर्वसामान्यासाठी आपला भ्रमणध्वनी कायम उपलब्ध करून देतात, तर काहींना तसे आवडत नाही. अर्थात नागरिकांच्या समस्या सोडवणे हा उद्देश सर्वांचाच असतो.
महापालिका आयुक्त निपूण विनायक यांचा ट्विटरद्वारे समस्या सोडवण्यावर भर 

औरंगाबाद : महिन्याभरापूर्वी महापालिकेचे आयुक्त म्हणून दिल्लीहून स्वच्छता अभियानाचे संचालक असलेले डॉ. निपूण विनायक रूजू झाले. स्वच्छता अभियानाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेललेली असल्यामुळे आणि शहरात कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे त्यांची खास नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जाते. महापालिका कार्यालय म्हणजे सतत गजबजलेले. आयुक्तांकडे कैफियत घेऊन येणाऱ्यांची संख्या त्यात अधिकच. पण दिवसभर दालनाबाहेर सामान्यांना प्रतिक्षा करायला लावणे पटत नसल्याने आयुक्त निपूण विनायक यांनी थेट सोशल मिडियाचा आधार घेत आपल्या तक्रारी ट्‌विटरद्वारे मांडण्याच्या सूचना केल्या. 

प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपध्दती नेहमीच सामान्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. कुणाला दालनात गर्दी आवडते, तर कुणाला वर्दळ नकोसी वाटते. काही अधिकारी सर्वसामान्यासाठी आपला भ्रमणध्वनी कायम उपलब्ध करून देतात, तर काहींना तसे आवडत नाही. अर्थात नागरिकांच्या समस्या सोडवणे हा उद्देश सर्वांचाच असतो. 

थेट भेट नाही, दुरध्वीनवर संपर्क नाही, अशी कार्यपध्दती अवलंबल्यामुळे त्यांच्यावर सुरूवातीला टीकाही झाली. कचऱ्याच्या प्रश्‍नावरही त्यांनी हा प्रश्‍न सोडवणे कठीण असल्याचे विधान केले होते. परिणामी शहरवासियांचे त्यांच्याबद्दल काहीसे चुकीचे मत तयार झाले होते. पण निपूण यांनी कचरा, पाणी आणि इतर नागरी समस्यांचा आधी पूर्णपणे अभ्यास केला आणि थेट मुळाशी जाऊन तो सोडवण्यासाठी पावले उचलायला सुरूवात केली. 

महिनाभरात त्यांचे प्रयत्न प्रामुख्याने दिसायला लागले. त्यामुळे भेट नाही तर नाही पण समस्या सुटत असतील, तर काय हरकत असे आता नागरिक बोलताना दिसतात. कचराकोंडीने शहराचा जीव गुदमरत असतांना 16 मे रोजी महापालिका आयुक्त म्हणून डॉ. निपूण विनायक यांनी पदभार स्वीकारला. 

दालनातील आसनव्यवस्था बदलण्यापासून ते खुर्च्या हटवण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे उलटसुलट चर्चेला सुरूवात झाली होती. वैयक्तिक भ्रमणध्वनी कुणालाही न देण्याचा, त्यावर संपर्क न साधण्याच्या त्यांनी दिलेल्या सूचना देखील अनेकांच्या पचनी पडल्या नाहीत. आयुक्त कुणाशी बोलत नाहीत...भेटत नाहीत, म्हटल्यावर त्यांच्यावर सुरूवातीला टीका झाली, पण समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला ट्विटरचा मार्गच योग्य असल्याचे आता पटायला लागले आहे. 

ट्‌विटरवरून महत्वाच्या निर्णयांची माहिती
महापालिका आयुक्त औरंगाबाद महापालिकेचा पदभार स्वीकारण्यासाठी मुंबईहून विमानात बसले तेव्हापासूनच कामाला सुरूवात केली होती. ''विमानात औरंगाबादचे प्रवासी कोण आहेत, मी तुमचा नवा महापालिका आयुक्त आहे, तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत ते चिठ्ठीवर लिहून द्या", असे आवाहन त्यांनी केले होते. शहरात आल्यानंतर डॉक्‍टर, वकील, अभियंते अशा लोकांच्या भेटी घेऊन शहराच्या विकासासाठी तुमच्या मनात काय संकल्पना आहेत हे देखील निपूण यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

भेटी-गाठी, मोबाईल, दुरध्वनीवरून संवाद साधण्यात वेळ न दवडता थेट प्रश्‍न सोडवण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे महापालिकेत सामान्य जनतेशी निगडीत कुठल्याही निर्णयाची माहिती ते आपल्या ट्विटर हॅन्डलवरून तात्काळ देतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत शहरात सुरू करण्यात येणाऱ्या शंभर सिटी बस खरेदी प्रक्रियेसाठीच्या बैठकीचे देता येईल. 

13 जून रोजी दुपारी महापालिकेत टाटा, आयशर, अशोक लेलॅन्ड, महिंद्रा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्याची माहिती आयुक्तांनी दुपारी 2 वाजून 11 मिनिटांनी आपल्या ट्‌विटर हॅन्डल वरून तात्काळ शहरवासियांना दिली. प्रकल्प नियोजना नूसार सुरू असल्याचे नमूद करतांनाच तुमच्या सगळ्यांच्या आर्शिवादाने काही महिन्यात परिस्थिती बदलेल, असा दिलासा देखील त्यांनी दिला. एकंदरित सुरूवातीला खटकणारी आयुक्त डॉ. निपूण विनायक यांची कार्यपध्दती आता औरगांबादकरांना योग्य वाटायला लागली आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com