Aurangabad : clash among shivsena and maratha morcha workers | Sarkarnama

औरंगाबाद :मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व शिवसैनिकांत हाणामारी

जगदीश पानसरे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

तिथीनुसार  चार मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती वरून बुधवारी (ता. 28) औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व शिवसैनिक एकमेकांना भिडले.

औरंगाबाद : तिथीनुसार  चार मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती वरून बुधवारी (ता. 28) औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व शिवसैनिक एकमेकांना भिडले. दोन्ही गटात हाणामारी झाली . समर्थनगर येथील शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उदघाटन  सुरू असतांनाच हा प्रकार घडला.

तारखेनुसार आणि तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोनदा साजरी करण्यास मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला होता. त्यामुळे यंदा मराठा क्रांती मोर्चासह इतर संघटनांनी तारखे नुसार जल्लोषात शिवजयंती साजरी केली होती. तिथीनुसार  शिवजयंती साजरी करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या लोकप्रतिनिधीनी देखील सहभाग नोंदवत 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांना अभिवादन करत शुभेच्छा दिल्या होत्या.

सरकारने देखील तारखेनुसारच शिवजयंती साजरी करावी अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे .  सत्ताधारी शिवसेना-भाजप हे पक्ष  तिथीनुसार चार मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यावर ठाम राहिले . त्यासाठी  आज सायंकाळी समर्थनगर येथे चार मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जिल्हा शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 15 ते 20 समन्वयक सावरकर पुतळ्याजवळ जमले होते. शिवसैनिकांना ही माहिती मिळताच त्यांनी तिकडे धाव घेत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वादावादी होऊन हाणामारी झाली. प्रकरण चिघळण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवसैनिकांना दूर केले. दरम्यान, मारहाणीचा प्रकार कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगवले.

एक शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करू- प्रदीप जैस्वाल

या वादा संदर्भात सरकारनामाशी बोलतांना शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल म्हणाले," मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व शिवसैनिकांमध्ये वादावादी झाली पण हा प्रकार गंभीर नव्हता. शिवाजी महाराजांची जयंती एकच साजरी करा अशी समन्वयकांची मागणी होती. त्यावर पुढील वर्षी मुख्यमंत्री व सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेऊ. शिवाजी महाराजांची जयंती एकच साजरी व्हावी अशी आमची देखील भूमिका असल्याचे मी त्यांना सांगतिले. किरकोळ वाद झाला, आमच्याकडून या संदर्भात कुठलीही तक्रार पोलीसात करण्यात आलेली नाही. शिवसेना तिथीनुसार चार मार्च रोजी शिवजंयती साजरी करणार आहे ."

 शिवसैनिक अंगावर आले- रविंद्र काळे

" 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्यानंतर पुन्हा शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या संदर्भात चर्चा व एकच शिवजयंती साजरी केली जावी अशी विनंती करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे 10-15 समन्वयक सावरकर पुतळ्या जवळ जमलो होतो. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्यांशी चर्चा करत असतांनाच मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या अंगावर धावून आले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यात रविंद्र तांगडे हे समन्वयक जखमी झाले आहेत. या मारहाणीची तक्रार पोलीसांत करायची की नाही याचा निर्णय आम्ही बैठक घेऊन ठरवणार आहोत ,"असे  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.

संबंधित लेख