aurangabad bjp and shivsena | Sarkarnama

मंत्री कुणालाही करा, पण औरंगाबादला प्रतिनिधित्व द्या - संजय सिरसाट

जगदीश पानसरे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मंत्रिमंडळ फेरबदलात वर्णी लागावी यासाठी पूर्वचे आमदार अतुल सावे व गंगापुर-खुल्ताबादचे प्रशांत बंब यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. अतुल सावे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून प्रयत्न करत आहेत. तर प्रशांत बंब स्वःत मंत्रालयात ठाण मांडून आहेत.

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदल आणि विस्तारानंतर आता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ फेरबदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याची पर्यटन व मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री कुणालाही करा, पण औरंगाबादला प्रतिनिधित्व द्या अशी भूमिका पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय सिरसाट यांनी सरकारनामाशी बोलतांना मांडली. 

राज्याच्या मंत्रिमंडळात काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहेत, तर काही मंत्र्यांनाच डच्चू दिला जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर लगेचच राज्यात बदल गेले जातील असे बोलले जात होते. पंरतु हा मंत्रिमंडळ फेरबदल लांबवण्यात आला होता. सत्ताधारी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षाला मराठवाड्याने भरभरून यश दिले. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या औरंगाबादला मंत्रीपद मिळेल अशी सुरुवातीला सगळ्यांनाच आशा होती. पण फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले हरिभाऊ बागडे यांना विधानसभा अध्यक्षपद दिल्यानंतर पुन्हा शहराला मंत्रीपद देण्यास फडणवीस इच्छुक नव्हते. 

त्या तुलनेत जालना जिल्ह्याला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद देऊन झुकते माप देण्यात आले. पुन्हा मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागल्याने जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे यासाठी भाजपचे आमदार अतुल सावे, प्रशांत बंब यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी देखील जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मंत्रिपदावर संधी मिळावी अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. 

शिवसेनेचे संजय सिरसाट हे सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय सिरसाट की अर्जून खोतकर असा प्रश्‍न निर्माण झाला तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खोतकरांच्या नावाला पसंती दिल्यामुळे त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. तेव्हापासूनच संजय सिरसाट नाराज होते. आता पुन्हा मंत्रीमंडळ फेरबदलाची चर्चा झाल्यामुळे शिवसेनेकडून संजय सिरसाट किंवा पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची नावे समोर येत आहेत. 

या संदर्भात सिरसाट यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, सुरुवातीपासूनच औरंगाबाद शहराला मंत्रीपद मिळावे अशी आमची आग्रही मागणी होती. माझ्यासह संदीपान भुमरे, अतुल सावे, प्रशांत बंब या पैकी कुणालाही मंत्री करा, पण शहराला प्रतिनिधित्व दिले गेले पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. 

सावे, बंब यांच्यात रस्सीखेच 
मंत्रिमंडळ फेरबदलात वर्णी लागावी यासाठी पूर्वचे आमदार अतुल सावे व गंगापुर-खुल्ताबादचे प्रशांत बंब यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. अतुल सावे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून प्रयत्न करत आहेत. तर प्रशांत बंब स्वःत मंत्रालयात ठाण मांडून आहेत. मतदारसंघातील संपर्क, जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई उभारत समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात बंब यांची भूमिका महत्वाची होती. या शिवाय गंगापूर साखर कारखाना खाजगी उद्योजकांच्या घशातून काढण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे बंब यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते. शिवाय मुख्यमंत्र्यांशी बंब यांची असलेली जवळीक त्यांना फायद्याची ठरू शकते. 
माझे प्रयत्न सुरु आहेत- सावे 
येत्या 21 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ फेरबदल होणार आहे. नव्या मंत्रीमंडळात शहराला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. चर्चा अनेक नावांची असली तरी कुणाची वर्णी लागेल हे आताच सांगता येणार नसल्याचे अतुल सावे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

संबंधित लेख