Aurangabad all shops , colleges& schools remain close | Sarkarnama

औरंगाबाद : शहरात कडकडीत बंद, तोडफोडीच्या घटना 

जगदीश पानसरे
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा क्रांती मोर्चा सनन्वयाकांनी मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला शहरात उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.

औरंगाबाद  :  मराठा आरक्षणाची मागणी करत काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा सनन्वयाकांनी मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला शहरात उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. तर अफवांवर चाप लावण्यासाठी संपुर्ण जिल्ह्याची इंटरनेट सेवा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र बंद दरम्यान एसटीला लक्ष्य करू नका असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी एसटी बससेवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. शहरात आज सकाळपासूनच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करत होते. बंद दरम्यान हिंसक घटनेची शक्‍यता लक्षात घेऊन शहरातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानी घेतला होता. 

बंदचा सर्वाधिक फटका एसटी बसेसला बसतो. यापुर्वीच्या भीमा-कोरेगांव घटनेच्या वेळी हे समोर आले होते. त्यामुळे सिडको आणि सेंट्रल बसस्थानकातून आज एकही एसटी सोडण्यात आली नाही. रिक्षा व इतर वाहनांची देखील रस्त्यांवर तुरळक गर्दी होती. 

महाराष्ट्र बंद दरम्यान सोशल मिडियावरून अफवा पसरवल्या जाऊ नयेत याची खबरदारी म्हणून काल रात्रीपासूनच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पोलीस आयुक्त डॉ. चिरंजीव प्रसाद, ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह यांनी देखील अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही घटने मागचे सत्य जाणून घेण्यासाठी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलीस आयुक्तांनी केले आहे. तसेच शहरात शांतता कायम राखण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

बंद दरम्यान शहरात काही ठिकाणी हिंसक घटना देखील घडल्या. बंदचे आवाहन करत असतांना आंदोलकांनी अदालत सरोडवरील चारचाकी शोरुमवर दगडफेक केली. भाजीमंडई, सराफा बाजार पुर्णपणे बंद होता. 

हर्सुलमध्ये तरुणांच्या एका गटाने  रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. दरम्यान, एसटी महामंडळाच्या एका बसवर टोळक्‍यातील काही तरुणांनी दुपारी एकच्या सुमारास दगडफेकही केली. 

भीमा-कोरेगांव, मे मध्ये उसळलेली जातीय दंगल यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुकारण्यात आलेल्या बंद मुळे शहरवासियांनी पुन्हा एकदा तणावाला तोंड द्यावे लागले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख