aurangabad abdul sattar news | Sarkarnama

अब्दुल सत्तार प्रकरणी कॉंग्रेसचे हाताची घडी, तोंडावर बोट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जून 2017

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातले कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे शेतकरी मारहाण व शिवीगाळ प्रकरणामध्ये एकाकी पडल्याचे चित्र आहे. शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला केलेली मारहाण व असभ्य भाषेचा वापर यामुळे निर्माण झालेल्या वादापासून कॉंग्रेस चार हात अंतर राखून आहे. सिल्लोड, सोयगांव, वैजापूर, पैठण तालुक्‍यात सत्तारांच्या अटकेच्या मागणीसाठी विरोधी पक्षांकडून निदर्शने, बंद व आंदोलन होत असतांना कॉंग्रेसने मात्र हाताची घडी तोंडावर बोटचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातले कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे शेतकरी मारहाण व शिवीगाळ प्रकरणामध्ये एकाकी पडल्याचे चित्र आहे. शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला केलेली मारहाण व असभ्य भाषेचा वापर यामुळे निर्माण झालेल्या वादापासून कॉंग्रेस चार हात अंतर राखून आहे. सिल्लोड, सोयगांव, वैजापूर, पैठण तालुक्‍यात सत्तारांच्या अटकेच्या मागणीसाठी विरोधी पक्षांकडून निदर्शने, बंद व आंदोलन होत असतांना कॉंग्रेसने मात्र हाताची घडी तोंडावर बोटचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतांनाची एकाधिकारशाही आणि वरिष्ठ नेतृत्वावर जाहीरपणे केलेली टीका यामुळे सत्तार यांच्या पाठीशी उभे राहण्यास जिल्ह्यातील कॉंग्रेसचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता तयार नाही. त्यामुळे सत्तार यांना या प्रकरणात एकट्यानेच लढा द्यावा लागणार एवढे मात्र निश्‍चित. 

"दहिगांव शिवारात माझी शंभर एकर जमीन, फार्महाऊस आहे, मग मी कुणाची जमीन का हडपू? माझा काय संबंध? असा पावित्रा घेणारे कॉंग्रेसचे आमदार अब्दुल 
सत्तार यांनी आपल्या श्रीमंतीचे जाहीर प्रदर्शन खुलासाकरते वेळी केले होते. लक्ष्मण कल्याणकर व विठ्ठल सपकाळ या कॉंग्रेस नगरसेवकांनी शेख मुख्तार शेख सत्तार यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीच्या वादात अब्दुल सत्तार यांनी उडी घेतली.

व्यवहार माझ्यासमक्ष चोवीस वर्षापुर्वी झाला होता, म्हणून मी भांडण सोडवायला गेलो, शिवीगाळ करून शेख मुख्तार व इतरांना हाकलून लावले नसते तर तिथे खून झाला असता असे न पटणारे समर्थन सत्तार यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन केले. परंतु शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ बराच बोलका? आणि सत्तार यांची भूमिका केवळ भांडण सोडवण्यापुरतीच मर्यादित होती का? याचा विचार करायला लावणारा आहे. 

सत्तारांचे खरे रूप दिसले 
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ व दोनवेळा सिल्लोड सोयगांव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आमदार अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. आदर्श प्रकरणात अडकलेल्या चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, आणि त्यानंतर आलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी सत्तार यांची राज्यमंत्रीपदावरून उचलबांगडी केली. त्यामागे सत्तांराचे कारनामेच कारणीभूत होते असे सांगितले जाते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही सत्तार यांनी आपली विजयी पताका कायम ठेवली होती.

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघ वगळता इतर ठिकणी सत्तार यांचे वागणे सभ्य व प्रगल्भ राजकारण्यांसारखेच असते, पण जमीनीच्या वादातून त्यांनी केलेली मारहण व असभ्य भाषेतील शिवीगाळ हाच त्यांचा खरा चेहरा असल्याचे बोलले जाते. शिवाय शेतकऱ्याला मारहाण केल्याचे सत्तार यांचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापुर्वी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसकडून तिकीट मागणाऱ्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याला सत्तार यांनी लाथाबुक्‍यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत तुडवले होते. 

.... हा त्यांच्या तालुक्‍याचा विषय 
नगरपालिका निवडणुकीत पक्षाने सहकार्य केले नाही, प्रचारासाठी वरिष्ठ नेते फिरकले नाही असा आरोप करत सत्तार यांनी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपण फक्त मतदारसंघातच लक्ष घालणार असे जाहीर करून निवडणुक प्रक्रियेतून अंग काढून घेतले होते. प्रभारी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनीदेखील मग सुंठे वाचून खोकला गेला म्हणत सिल्लोड-सोयगांव तालुक्‍यातील उमेदवार निवडीचे सर्वाधिकार सत्तार यांना देऊन बी फॉर्म देखील पाठवून दिले होते. जिल्हा परिषदेच्या प्रचाराला मराठवाड्यात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आलेले असतांना सत्तार यांनी मात्र त्यांना आपल्या मतदारसंघात अघोषित बंदी केली होती.

सत्तार यांनी मला पक्षाची गरज नाही हे कृतीतून दाखवून दिल्याने पक्षाने देखील त्यांना गांभीर्याने न घेण्याचे धोरण अवलंबले. हे धोरणच सत्तार यांच्यासाठी आता अडचणीचे ठरत आहे.

त्यामुळे स्वःताच्या बचावासाठी त्यांना सिल्लोड तालुका कॉंग्रेस कमिटीचा आधार घ्यावा लागला. या संपुुर्ण प्रकरणावर कॉंग्रेसची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष नामदेव पवार यांच्याशी "सरकारनामा' प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सावध भूमिका घेतली. " शेतकरी कर्जमाफीच्या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांनी केलेला हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

सत्तार यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व माफी मागितल्यावर विषय संपायला हवा, पण विरोधक राजकारण करत आहेत. हा विषय त्यांच्या 
तालुक्‍याचा असल्यामुळे त्यात जिल्हा कॉंग्रेसने हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही, सत्तारांच्या समर्थनात आज निघालेल्या मोर्चाची गर्दी पाहून सिल्लोडची जनता त्यांच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते असे म्हणत नामदेव पवारांनी अधिक बोलणे टाळले. 

संबंधित लेख