Auranagabad people should give me one chance I will provide clean and safe city : Raj Thakre | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

औरंगाबादकरांनो एकदा संधी द्या, स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो: राज ठाकरे

जगदीश पानसरे 
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

थापा मारुनच सत्तेत राहता येते. तर मलाही महिना- दोन महिने   भाजपात जाऊन यावे लागेल. तसेही आजच पंतप्रधान नेपाळला गेलेत. नवीन 'थापा' आणायलाच गेले असावेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली . 
 

औरंगाबाद: " तुम्ही राजकारणाचे बळी ठरला आहात, घाबरून मतदान करता. एकदा डोळे उघडून नीट बघा, कानावरचे हात बाजूला काढा. आधी तुम्ही बदला मग शहर बदलेल .  संधी द्या, स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो." असा शब्द राज ठाकरे यांनी औरंगाबादवासीयांना दिला.

औरंगाबाद व्हिजन  कार्यक्रमात त्यांनी शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला. "विकास कामांवर मतदान होतं याच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही विकासाला मतदानच करत नाही. अडचणीच्या वेळीच तुम्हाला राज ठाकरे आठवतो असा टोला लागवतानाच नाशिक महापालिकेत झाले तसे काम तुमच्या शहरात देखील होऊ शकते ,"असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद शहरात राजकारणी तुम्हाला भीती दाखवतात, निवडणुकीच्या वेळी दंगली घडवल्या की तुम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करता, मग कशाला हवा तुम्हाला विकास असा टोला लागवत राज ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर निशाणा साधला.

गेल्या २५ वर्षात तुमचे शहर आणि खासदार काहीच बदलले नाही असा चिमटा काढत लोकप्रतिनिधींना तुमची भीतीच वाटत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले ,"त्यामुळेच कचरा प्रश्‍न तसाच रेंगाळत पडला आहे. नाशिकला आम्ही काही नसतांना खूप चांगल्या गोष्टी केल्या. तुमच्याकडे तर जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्या आहेत.जगभरातील विमानं तुमच्या शहरात उतरायला हवीत. या लेण्यांची योग्य काळजी आणि मार्केटिंग केले तर महाराष्ट्राला हजारो कोटी मिळतील."

 " राजकारण आणि मतदान हसण्यावारी घेऊ नका असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले. छोट्या मोठ्या घटनांना घाबरू नका, एकदा मला संधी द्या, मग बघतो तुम्हाला कोण हात लावतो ते ,"असा विश्वास व्यक्त करतानाच पुढच्या वेळी येईल तेव्हा शहराच्या विकासाचा आराखडा तुमच्या समोर ठेवीन असा शब्द देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

 " सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते 'ते' हैद्राबाद वरुन येतात, भीतीदायक वातावरण करतात, दोघांचाही लाभ करुन पाच वर्षासाठी निघून जातात. कामावरती मतदान होते, याच्यावरील माझा विश्‍वास उडाला आहे. विकासावर मतदान होतच नाही. औरंगाबादचे राजकारण कित्येक वर्ष धर्मावरच सुरु आहे. कामाची पावती मतदानातून मिळाली तरच विकास होईल, " असेही ते म्हणाले . 

 
 

संबंधित लेख