Audio Clip is Fake Claims Deepak Salunkhe | Sarkarnama

ती आॅडिओ क्लिप माझी नव्हेच - दीपक साळुंखेंचा दावा

भारत नागणे 
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे आणि अक्कलकोट येथील आेबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मोतीराम चव्हाण यांच्यामध्ये मोबाईलवर झालेल्या संभाषणाची वादग्रस्त आॅडीओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. या प्रकाराची दखल पक्षपातळीवर घेण्यात आली आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसला व मला बदनाम करण्यासाठीच राजकीय हेतूने कोणीतरी बनावट आवाजात आॅडीओ क्लिप तयार करुन ती व्हायरल केली. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांचा पोलिस शोध घेऊन त्याच्यावर लवकरच कारवाई करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे आणि अक्कलकोट येथील आेबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मोतीराम चव्हाण यांच्यामध्ये मोबाईलवर झालेल्या संभाषणाची वादग्रस्त आॅडीओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. या प्रकाराची दखल पक्षपातळीवर घेण्यात आली आहे. वादग्रस्त आॅडीओ क्लिपशी माझा कसलाही संबंध नाही, कोणीतरी खोडसाळपणे बनावट आवाजात क्लिप तयार केल्याचा दावा साळुंखे यांनी यापूर्वीच केला आहे.

दरम्यान संभाषणातील मोतीराम चव्हाण यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे याविषयाचे गुढ वाढले होते. बुधवारी  दीपक साळुंखे व राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीच मोतीराम चव्हाण यांना पत्रकार परिषदेत हजर केले. यावेळी मोतीराम चव्हाण यांनी देखील तो माझा आवाज नसून तो बनावट असल्याचे सांगत या आवाजाशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
दोघांनी ही या प्रकरणात षडयंत्र  असल्याचे स्पष्ट केल्याने आता या वादावर पडदा पडला आहे.

सध्या राज्यात राष्ट्रवादीसाठी वातावरण पोषक आहे. पक्षाला व पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम काही लोकांकडून जाणूबुजून केले जात आहे. अशा प्रकाराचे कृत्य करुन पक्षाला बदनाम करणाऱ्या लोकांचा शोध घेवून त्यांना चांगला धडा शिकवू असे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.  यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव, दिगंबर सुडके यांच्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख