आमदार राणांविरुद्ध खासदार अडसूळांचा अॅट्रोसिटीचा गुन्हा

आमदार राणांविरुद्ध खासदार अडसूळांचा अॅट्रोसिटीचा गुन्हा

अमरावती : शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या तक्रारीवरून युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला.

सिटी बॅंक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याच मुद्द्यावरून खासदारांच्या नावाचा उल्लेख करत बदनामी करण्याचे काम सोशल मिडीयाच्या माध्यमाने आमदार राणा व त्यांच्या काही समर्थकांकडून सुरू आहे, असा आरोप खासदार अडसूळ यांनी तक्रारीतून केला.

राणांनी आरोप केल्यानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांची भेट घेत आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे अमरावतीच्या राजकीय पटलावर परत एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणार आहेत. 

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैमनस्याला पुन्हा तोंड फुटल्याचे बोलले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात आमदार राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. नवनीत राणा यांच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राला आनंदराव अडसूळ यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. ही लढाई आमदार राणा यांनी जिंकली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवनीत राणा सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नसल्या तरी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने त्या उमेदवार म्हणून पुन्हा रिंगणात उतरू शकतात.

 
`दहा गुन्हे दाखल झाले तरी चालतील!`

सिटी बॅंकेत झालेल्या घोटाळ्याबाबत मी आवाज उठविला. गोरगरिबांची आयुष्याची जमापुंजी मिळावी यासाठी माझा लढा आहे. एखादा घोटाळा उघड करणे, हा गुन्हे आहे का? जोपर्यंत गोरगरिबांचे पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत अगदी शेवटच्या टोकापर्यंत हा लढा सुरूच राहील. मग असे दहा गुन्हे दाखल झालेत तरी चालतील, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com