अटलजी म्हणाले, आपकी बॅंक हमारी पार्टी को कर्जा देगी क्‍या... ?

जिना चढत असतांना ते चेअरमनला म्हणाले, " आपकी बॅंक हमारी पार्टी को कर्ज देगी क्‍या?'', यावर थोडावेळ शांत होत त्या चेअरमनने "नाही ", असे उत्तर दिले.
अटल बिहारी वाजपेयी औरंगाबादला आले असताना त्यांचे हरिभाऊ बागडे आणि बसय्ये  बंधू सोबत घेतलेले छायाचित्र
अटल बिहारी वाजपेयी औरंगाबादला आले असताना त्यांचे हरिभाऊ बागडे आणि बसय्ये बंधू सोबत घेतलेले छायाचित्र

औरंगाबादः भाजपचे वरिष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सानिध्यात मी जिल्हा भाजप सरचिटणीस झाल्यावर 1980 मध्ये आला. तत्पुर्वी जनसंघांचे अधिवेशन, सभा, मेळाव्याच्या निमित्ताने अटलजी औरंगाबादेत आले पण तेव्हा फक्त त्यांचे भाषण ऐकण्याचाच योग आला. त्यांच्या सहवासाच्या अनेक आठवणींना आज दाटून येत आहेत . 

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव अर्बन बॅंकेच्या उद्घाटन प्रसंगीचा एक किस्सा सांगतांना हरिभाऊ बागडे म्हणाले, अटलजींना खामगांव अर्बन बॅंकेच्या उद्धटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. औरंगाबादहून त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी मी व डॉ. विजय मेहर यांच्यावर होती. ऍम्बेसेडर गाडीत बसूून आम्ही खामगावला जाण्यासाठी निघालो. 

पावसाळ्याचे दिवस असल्याने चिखली जवळील एक ओढा ओसंडून वाहत होता. थोडावेळ थांबून आम्ही पाण्यातून गाडी काढली आणि खामगांवला पोहचलो. अटलजींनी बॅंकेचे फित कापून उद्घाटन केले आणि बॅंकेचा वरचा मजला पाहण्यासाठी चेअरमन सोबत जीना चढत होते. जिना चढत असतांना ते चेअरमनला म्हणाले, " आपकी बॅंक हमारी पार्टी को कर्ज देगी क्‍या', यावर थोडावेळ शांत होत त्या चेअरमनने "नाही ", असे उत्तर दिले. अटलजी हे उत्तर ऐकून खूष झाले आणि त्यांनी चेअरमनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत म्हणाले,  "बराबर है!"

कुछ नही हुआ बैल आये थे... 

अटलजी मिश्‍किील तितकेच हजरजबाबी होते. 1967 ला औरंगाबादच्या लॉ कॉलेज मैदानावर जनसंघाच्या अधिवेशनाची सभा ठेवण्यात आली होती. या सभेत कॉंग्रेसचे काही तरुण कार्यकर्ते घुसून गडबड करणार असल्याची माहिती आम्हाला अगोदरच लागली होती. पण कुणालाही मारायचे नाही फक्त पकडून ठेवायचे असे ठरले होते. आताच्या सरस्वती भूवन समोरील रस्त्यावर सायंकाळी अटलजींची सभा सुरू झाली आणि अपेक्षेनूसार पाच-सहा तरूणांनी मध्येच उठून घोषणाबाजी करायला सुरूवात केली. 

अचनाक झालेला गोंधळ पाहून लोकांची पळापळ सुरू झाली तेव्हा अटलजींनी उपस्थितांना शांत करत ' कुछ नही हुआ है, बैठ जाओ, सभा मे कुछ बैल घुस आये थे, चले गये' असे म्हणत लोकांना शांत केले. अटलजींनी ज्यांना बैल संबोधले होते ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, आणि त्यावेळी कॉंग्रेसची निशाणी बैल होती. या निशाणीवरून त्यांनी अचूकपणे साधलेला निशाना लक्षात आल्यानंतर सभेत एकच हशा पिकला होता. 

मजुरांचा निकृष्ट गहू बदलून मिळाला.. 

1985 मध्ये मी आमदार झालो. पुढील वर्षी मराठवाड्यात पाऊस कमी झाला आणि दृष्काळसदृश परिस्थीती निर्माण झाली. तेव्हा मराठवाड्याचा दौरा करण्याचा निर्णय अटलजींनी घेतला. जळगांवहून ते औरंगाबादला येणार असल्यामुळे शहराजवळी सांवगीच्या नायगांवात जाऊन पाहणी करण्याचे ठरवण्यात आले. मजूर प्रत्यक्ष जिथे काम करतात त्या पाझर तलावावर अटलजींना घेऊन जाण्याचा मी निर्णय घेतला. 

माझ्याकडे त्यावेळी स्वतःची गाडी नव्हती. अटलजींची ऍम्बेसेडर कार तिथपर्यंत जाणे शक्‍य नव्हते. आमदार असलो तरी आम्हाला मतदारसंघात फिरण्यासाठी महिन्यातून पंधरा दिवस बीडीओ, तहसिलदार किंवा अभियंत्याची गाडी दिली जायची. अशाच एका गाडीतून मी अटलजींना घेऊन नायगांव येथील पाझर तलावावर घेऊन गेलो. ड्रायव्हरला पाठीमागे बसवून मी स्वतः गाडी चालवली. 

चारशे ते पाचशे मजूर पाझर तलावावर काम करत होते. अटलजींनी त्यांच्यांशी हिंदीतून संवाद साधला. तेव्हा अनेकांनी आम्हाला मिळणारा गहू निकृष्ट असल्याचे त्यांना दाखवले. तो गहू घेऊन अटलजी औरंगाबादेत आले, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तो गहू पत्रकारांना दाखवला. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मजुरांना गहू बदलून दिला . 

(आ. हरिभाऊ बागडे महाराष्ट्र  विधानसभेचे अध्यक्ष आहेत . )
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com