atalji artical dr. n lad | Sarkarnama

मृदू मनाचा पंतप्रधान 

 डॉ. एन. लाड , प्रसिद्ध अस्थिशल्यविशारद 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी हे अतिशय मृदू स्वभावाचे पंतप्रधान होते. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्याच्या टीममध्ये मीदेखील सहभागी होतो. या दोन्ही शस्त्रक्रियांदरम्यान, उपचारादरम्यान मी त्यांचा सहवास जवळून अनुभवला. या उपचारादरम्यान त्यांनी कधीही त्रागा केला नाही. त्यांनी अमूकतमूक गोष्टींचा हट्ट धरला नाही. यामुळेच त्यांच्यातला अतिशय हळवा माणूस मला अनुभवायला मिळाला. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेदरम्यान त्यांना पहिल्यांदा गुडघेदुखीचा त्रास जाणवला. चालणंच कठीण होऊन बसल्यानं त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्‍टर राणावत यांची भेट घेतली. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार, असा सल्ला डॉ. राणावत यांनी भेटीदरम्यान त्यांना दिला.

जे काही उपचार वा शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्या भारतातच होऊ दे, असे वाजपेयी यांचे म्हणणे होते. डॉ. राणावत यांनी मुंबईतील टीमसह ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 1999 मध्ये वाजपेयींवर शस्त्रक्रिया केली. त्या टीममध्ये मी होतो.

या पहिल्या शस्त्रक्रियेदरम्यान अटलबिहारी वाजपेयींसोबत पहिली भेट झाली. त्यानंतर दुसऱ्या गुडघ्यावरही 2001 मध्ये शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रियाही ब्रीच कॅण्डी रुग्णालयात झाली. या दोन्ही शस्त्रक्रियांदरम्यान त्यांनी कमालीची सहनशीलता दाखवली. पंतप्रधान असल्याचा बडेजाव अजिबात न दाखवता ते आमच्याशी अत्यंत साधेपणाने वागत असत.

या वेळी त्यांचं कविमनही आम्हाला जवळून अनुभवता आलं. निळ्याशार समुद्राचं विहंगम दृश्‍य पाहताना त्यांना चारोळी सुचायच्या. वेदनांवरही सहज फुंकर मारत त्यांना स्फुरणाऱ्या कविता आम्हालाही सकारात्मक ऊर्जा द्यायच्या. 
वि. दा. सावरकरांवरील चित्रपटाची सीडी पंतप्रधान वाजपेयींना भेट म्हणून देण्याची इच्छा एकदा सुधीर फडके यांनी माझ्याकडे व्यक्त केली.

मी ती सीडी वाजपेयींना दिली. मात्र फडके स्वतः का आले नाहीत, असा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला. सुरक्षेच्या कारणास्तव भेट नाकारली गेली, असं उत्तर एकल्यावर खुद्द अटलजींनीच सुधीर फडकेंची भेट घेण्याची इच्छा दर्शविली. या भेटीचा प्रसंग सुधीर फडके आणि माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.

डॉ राणावत यांना 2003 मध्ये पद्मभूषण सन्मान मिळाला. त्या वेळी मला पुन्हा वाजपेयींना भेटायची संधी मिळाली. परंतु त्यानंतर त्यांची पुन्हा भेट नाही झाली. शेवटच्या काळात त्यांची स्मृतीही हरपली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे. परंतु त्यांच्या सहवासातील ते दिवस आजही सकारात्मक ऊर्जा देतात.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख