atalbihari vajpeyi visit sangli five time | Sarkarnama

सांगलीच्या फोंड्या माळावर विचार पेरण्यासाठी वाजपेयींनी 5 दौरे केले होते! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आज जिल्हा भाजपमय झाला आहे. वाजपेयी आता हयात नाहीत. मात्र त्यांनी या फोंड्या माळावर पेरलेल्या विचारबीजांनी आज भाजपचा विस्तार झाला आहे. पक्षीय अस्पृश्‍यता पाळता कामा नये या विचाराने त्यांनी भाजपला सतत विस्तारत नेले. आज हा विचार राजकीय सत्तेच्या रुपाने फोफावला आहे. 

सांगली : विलिंग्डन महाविद्यालयाच्या प्रांगणात एक विद्यार्थी नेता म्हणून हजर राहिलेले अटलबिहारी वाजपेयी ते देशातील सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेतील विरोधी पक्षनेता या प्रत्येक टप्प्यावर एकूण पाच वेळा वाजपेयी सांगलीत आले. 

त्यांची 1995 ची तरुण भारत स्टेडियमवरील सभा ही सुमारे तीस हजार इतक्‍या जनसमुदायाची होती. सांगलीतील अनेक ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांशी त्यांचा स्नेह होता. त्यामुळेच त्यांच्या आग्रहाखातर अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांनाही त्यांनी आवर्जून हजेरी लावली. 

1957 मध्ये ते पहिल्यांदा सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयावर विद्यार्थी संघटनेच्यावतीने आयोजित जाहीर सभेसाठी आले होते. त्यानंतर 1962 मध्ये त्यांची राजवाड्यातील पटांगणात जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांना 51 हजार रुपयांचा निधी पक्षकार्यासाठी देण्यात आला होता. काकासाहेब लिमये, बापूसाहेब पुजारी, बाबा पोतदार यांच्या पुढाकाराने ती सभा झाली होती. सांगलीच्या राजकारणातील ती एक ऐतिहासिक सभा होती. तुडुंब गर्दीत पक्षनिधी देण्यात आला. त्यामुळे ही सभा सांगलीच्या राजकारणात ऐतिहासिक अशीच ठरली. त्यानंतर 1978 मध्ये जनता पक्षाच्या काळात जिल्हा नगरवाचनालयाच्यावतीने त्यांना निमंत्रित केले होते. लता मंगेशकर यांना आजीव सभासदत्व बहाल करण्याच्या हेतूने ते आले होते. त्या सभेला लतादीदी नव्हत्या; मात्र सुमारे तासाभराच्या भाषणात त्यांनी भारतीय संगीत परंपरेबद्दल भाषण केले होते. 1982 आणि 1987 मध्ये इस्लामपूरमध्ये जाहीर सभांच्या निमित्ताने आले होते. यावेळी पंढरपूरहून येताना मिरजेतही त्यांची जाहीर सभा झाली होती. देशस्तरावर त्यांचे व्यक्तिमत्त्व राष्ट्रीय नेता म्हणून विकसित होत होते. भाजपही देशव्यापी पक्ष म्हणून विस्तारत होता. त्यांचे संसदेतील सहकारी लालकृष्ण आडवाणी यांनी 1990 मध्ये रथयात्रे दरम्यान सांगलीत आले होते. राजवाड्यातील सभेत त्यांनी अटलबिहारींना पंतप्रधान करण्यासाठी सांगलीकरांना हाक दिली होती. 

वाजपेयींचा 14 नोव्हेंबर 1995 चा सांगली दौरा संपूर्ण दिवसभराचा होता. सकाळी त्यांनी डॉ. एस. बी. कुलकर्णी यांच्या माधवनगर येथील वैद्यकीय केंद्रास भेट दिली होती. दुपारी त्यांचे संघातील सहकारी कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्कार समारंभासाठी ते आले होते. वसंतदादा पाटील यांच्या विश्‍वासातील कृषी अधिकारी असलेल्या ठाकूर यांनी सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकासाठी पायाभूत काम केले होते. कॉंग्रेसमधील अनेकांनी आयोजित केलेल्या समारंभासाठी ते सांगलीत आले होते. त्यावेळी प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शांतिनिकेतनवरील भोजन समारंभासाठी ते आले होते. 

पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा, स्नेह ठेवणारा हा नेता होता. त्यांच्यातील सर्वसमावेशकता भारतीयत्वाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते. वाजपेयींच्या राजकीय कालखंडात जनसंघ आणि भाजपसाठी सांगलीची भूमी नेहमीच माळरानासारखी राहिली. मात्र त्या काळातही वाजपेयी यांनी सांगलीत अनेकदा सभा, समारंभांच्या निमित्ताने हजेरी लावली. आज जिल्हा भाजपमय झाला आहे. वाजपेयी आता हयात नाहीत. मात्र त्यांनी या फोंड्या माळावर पेरलेल्या विचारबीजांनी आज भाजपचा विस्तार झाला आहे. पक्षीय अस्पृश्‍यता पाळता कामा नये या विचाराने त्यांनी भाजपला सतत विस्तारत नेले. आज हा विचार राजकीय सत्तेच्या रुपाने फोफावला आहे. 
 

संबंधित लेख